डॉ.अश्विनी धात्रक गडचिरोलीच्या नगराध्यक्ष

0
15

गडचिरोली, दि.१८: येथील नगर परिषदेच्या अध्यक्ष म्हणून डॉ.अश्विनी धात्रक यांच्या नावाची आज पार पडलेल्या विशेष सभेत घोषणा करण्यात आली.
यापूर्वीच्या नगराध्यक्ष निर्मला मडके यांनी ३ सप्टेंबरला आपल्या पदाचा राजीनामा दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामा मंजूर केल्यानंतर नवीन नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु झाली. त्यानुसार ११ सप्टेंबरला मुख्याधिकाऱ्यांकडे नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करावयाचे होते. मात्र नगरसेविका डॉ.अश्विनी धात्रक यांचा एकमेव अर्ज पीठासीन अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. त्यामुळे डॉ.अश्विनी धात्रक यांच्या नावावर तेव्हाच शिक्कामोर्तब झाले होते. परंतु निवडणूक विभागाच्या प्रकियेनुसार आज विशेष सभा बोलावण्यात आली. या सभेत २५ नगरसेवकांपैकी १८ नगरसेवक उपस्थित होते. पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवणे यांनी प्रक्रियेचे वाचन करुन डॉ. अश्विनी धात्रक यांचा एकमेव अर्ज नगराध्यक्षपदासाठी आल्याची माहिती उपस्थित नगरसेवकांना दिली. त्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष म्हणून डॉ.अश्विनी धात्रक यांचे नाव जाहीर केले. यावेळी नगर सेवक प्रा.राजेश कात्रटवार, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुरेश सावकार पोरेड्डीवार, विजय गोरडवार, रमेश चौधरी, भूपेश कुळमेथे, संजय मेश्राम, संध्या उईके, मीनल चिमूरकर, नंदू कायरकर, बेबीताई चिचघरे, शारदा दामले, सुषमा राऊत, लता मुरकुटे, अजय भांडेकर, बाळू आखाडे उपस्थित होते.