केटीएस मधून पळालेल्या रूग्णाचा मृतदेह आढळला

0
6

गोंदिया,दि.२७- येथील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात औषधोपचारासाठी भरती झालेल्या रूग्णाने रात्रीला अचानक रूग्णालयातून पळ काढला. या रूग्णाचा २६ सप्टेंबर रोजी सिव्हील लाइनजवळच्या शीतलामाता मंदिर परिसरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणाने रूग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जितेंद्र नरेश बागडे (३३, रा. छोटा गोंदिया) असे मृताचे नाव आहे. जितेंद्र गेल्या कित्येक वर्षांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त होता. औषधोपचार करूनही आजार बरा होत नसल्याने तो qचचित होता. अशातच हा आजार बळावल्याने त्याला येथील केटीएस रूग्णालयात २५ सप्टेंबर रोजी दुपारी भरती करण्यात आले. वॉर्ड क्रमांक दोनमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असतानाच रात्री अचानक त्याने रूग्णालयातून पळ काढला. दरम्यान, जितेंद्र रूग्णालयातून पळाल्याची माहिती मिळताच रूग्णालय प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली. रूग्णालयातील पोलीस चौकीत घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जितेंद्रच्या कुटुंबाला कळविले. त्यावरून त्याच्या कुटुंबियांनीही शोधाशोध केली. परंतू, तो कुठेही आढळून आला नाही.शनिवारी सिव्हील लाइनजवळच्या शितला माता मंदिर परिसरात जितेंद्र मृतावस्थेत आढळून आला. या घटनेचे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या वर्षी केटीएस रूग्णालयातून पळून गेलेल्या एका व्यक्तीचा नागरा येथील तलावात मृतदेह आढळून आला होता. रूग्णालयात सुरक्षा यंत्रणेचा अभाव असल्यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप होत आहे.