कंपनीच्या कचर्‍यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका

0
18

वर्धा दि.२-: तालुक्यातील वायगाव (नि.) शिवारात असलेल्या संस्कार अँग्रो कंपनी व जिनिंगमधून निघालेला कचरा रस्त्याच्या कडेला टाकण्यात येतो. तसेच आदिवासी आश्रम शाळा परिसरात जळलेले जिनिंगचे टाकाऊ पदार्थ पाच महिन्यापांसून पडून आहे. वारंवार तक्रार करुनही हा कचरा व टाकाऊ पदार्थ नष्ट करण्यात आले नाही. या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या कंपनीतून निघालेला कचरा रस्त्याच्या कडेला व रिकाम्या भूखंडावर टाकले जाते. याच परिसरात आदिवासी आश्रम शाळा आहे. पावसामुळे टाकाऊ पदार्थ सडले आहे. त्यामुळे परिसरात याची दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्र्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शिवाय मार्गाने जाताना प्रवाश्यांना नाकाला रुमाल लावावा लागतो.
हा प्रश्न गंभीर होत असून यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. कंपनीकडे वारंवार तक्रार करुनही कचरा उचलण्यात आला नाही. विद्यार्थी, शिक्षक, प्रवासी व शेतकरी यांना नाहक या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराचा बंदोबस्त त्वरीत करण्याची मागणी जोर धरत आहे.