आयुर्वेदाला जगभर पोहोचवण्यासाठी संशोधन व्हावे- नितीन गडकरी

0
8

नागपूर ,दि. ३: जगात आयुर्वेदाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आयुर्वेदाकडे परकीय चलन मिळवून देणारे एक महत्वाचे साधन म्हणून पाहिले गेले पाहिजे. आयुर्वेदाला जगभर पोहोचवायचे असेल आणि त्याला जग मान्यता मिळवून द्यायची असेल तर त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आयुर्वेदाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याची परिणामकारकता आणखी वाढवता येऊ शकते, असेही श्री.गडकरी यांनी सांगितले.

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या प्रांगणात सुवर्ण महोत्सव पार पडला. यावेळी उद्घाटक व अध्यक्षस्थानावरुन श्री. गडकरी बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री नागो गाणार, प्रकाश गजभिये, डॉ.मिलिंद माने, सुधाकर कोहळे, आयुष संचालनालयाचे संचालक डॉ.कुलदीपराज कोहली, अधिष्ठाता डॉ.गणेश मुक्कावार, डॉ.सूर्यकांत भगत उपस्थित होते.

श्री. गडकरी म्हणाले, आपल्याकडे आयुर्वेदाचे ज्ञान व भांडार असले तरी आयुर्वेदामध्ये संशोधन झालेले नाही. त्या ज्ञानाला समाज मान्यता मिळवण्यासाठी त्याचे वेळोवेळी पुरावे सादर करायला हवेत. त्यावर प्रयोग व्हायला हवेत. आपण गुणात्मक बदल करीत नसल्याने आयुर्वेदाला मर्यादा पडतात. यासाठी आपली क्षमता, काम करण्याच्या पद्धतीत गुणवत्ता वाढविण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आयुर्वेदातून मोठा रोजगार मिळू शकतो. डॉक्टरांनीही होमिओपॅथी संशोधन केल्यास मोठी उपलब्धी मिळू शकते. याची अनेक उदाहरणे असल्याचे सांगून गडकरी यांनी आयुर्वेद रुग्णालयामध्ये सुधारणा घडवून आणण्याची व या महाविद्यालयाला ‘नॅशनल इन्स्टिट्यूटचा दर्जा’ मिळवून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही केले.

श्री. बावनकुळे म्हणाले, महाविद्यालयाच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी टाळ्या वाजवून मिळत नाही. त्यासाठी योग्य पद्धतीचा प्रस्ताव सादर करावा लागतो. पुढील आठवड्यापर्यंत कायदेशीर प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना देत त्यांनी संपूर्ण देशात या महाविद्यालयाचा नावलौकिक वाढण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे येऊ न शकल्यामुळे त्यांच्या संदेशाचे वाचन विभागप्रमुख डॉ.राजकुमार खियानी यांनी केले.

प्रास्ताविकातून अधिष्ठाता डॉ. मुक्कावार यांनी रुग्णालय व महाविद्यालयाविषयीची माहिती देऊन महाविद्यालयाच्या विकासासाठी 125 कोटीची गरज असल्याची बाब उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिली.

सूत्रसंचालन श्वेता शेलगावकर यांनी केले तर आभार डॉ.शशिकांत खेडीकर यांनी मानले. कार्यक्रमाला शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.विनय हजारे व आयुर्वेद महाविद्यालयचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.