देशात हिंदूराष्ट्र निर्मितीचे षड्यंत्र

0
7

नागपूर दि.५:: भाजप हे संघाची कळसूत्री बाहुली आहे. त्यामुळे देशावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) विचारधारा थोपविण्यासाठी हिंदूराष्ट्र निर्मितीचे षड्यंत्र पुन्हा एकदा रचले जात आहे, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय महासचिव खासदार सीताराम येचुरी यांनी येथे केली.

रिपब्लिकन परिवारतर्फे रविवारी विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित ‘संघीकरणविरोधी परिषदे’चे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. येचुरी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला धर्मावर आधारित देशाची रचना पूर्वीपासूनच करायची आहे. त्या दिशेने त्यांचे काम सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली तेव्हा राजकारणात भाग घेणार नाही, या अटीवर बंदी मागे घेण्यात आली. तेव्हा आरएसएसने स्वतंत्र राजकीय संघटन उभे केले. यातून जनसंघाची स्थापना झाली. नंतर भाजपात त्याचे रूपांतर झाले. त्यामुळे भाजपा संघापासून वेगळा नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बोलावताच पंतप्रधानांपासून तर सर्व मंत्री धावून जातात. आरएसएस त्यांच्या कामकाजाचा आढावा घेते. सध्या भारतीय सैन्य, शिक्षण, भरती प्रक्रिया आदी सर्वांचे संघीकरण सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

डॉ. भाऊ लोखंडे यांनी आपल्या भाषणात आंबेडकरी चळवळीतील विभिषणांचा समाचार घेत भूतकाळात झालेल्या दगाफटक्यावरही प्रकाश टाकला. प्रा. रणजित मेश्राम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आरएसएस बलाढ्य नाही, तर त्यांनी तयार केलेली मनोरचना ही बलशाली आहे. हिंदू समाजातील अनेक लोकांनाही आरएसएसच्या षड्यंत्राची कल्पना आहे. तेव्हा दलित, आदिवासी, ओबीसींना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून द्या, असे आवाहन केले.

निरंजन वासनिक यांनी भूमिका मांडली. प्रा. रत्नाकर मेश्राम यांनी प्रास्ताविक केले. छाया खोब्रागडे यांनी संचालन केले. प्रा. राहुल मून यांनी आभार मानले.