२१ ऑक्टोबरला गडचिरोलीत आदिवासी मेळाव्याचे आयोजन

0
21

गडचिरोली, दि.१८: जिल्हा गोटूल समिती व आदिवासी विद्यार्थी संघाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील चांदाळा मार्गावरील गोटूल भूमीवर २१ व २२ ऑक्टोबर रोजी आदिवासी देवतांची महापूजा व आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आ.डॉ.देवराव होळी व आविसंचे सरसेनापती नंदू नरोटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
आ.डॉ.होळी व नंदू नरोटे यांनी सांगितले की, क्रांतिवीर शहीद बाबूराव शेडमाके यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदिवासी मेळावा होणार आहे. बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते ११ वाजतापर्यंत मैदानी क्रीडास्पर्धा घेण्यात येतील. त्यानंतर “आधुनिक काळात ग्रामसभेचे महत्व व आदिवासी समाज” या विषयावर मार्गदर्शन करण्यात येईल. सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. उपमुख्य कार्यपालन अधिकारी श्री.धनकर, भामरागडचे संवर्ग विकास अधिकारी फरेंद्र कुतीरकर हे यावेळी मार्गदर्शन करतील. त्यानंतर आदिवासी मेळावा होईल. राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होईल. खा. अशोक नेते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून आ.डॉ.देवराव होळी, माजी आमदार आनंदराव गेडाम, डॉ.नामदेव उसेंडी, डॉ.नरेंद्र कोळवते, प्रा.दौलत धुर्वे, विकास राचेलवार, डॉ.सुनील मडावी, डॉ.मनोज पेंदाम, डॉ.वसंत पोरेटी, डॉ.योगेश सयाम,डॉ.शिवा कुमरे, भैयाजी येरमे, वसंत कुळसंगे, सुधाकर नाईक, विलास कोडाप, सदानंद ताराम, सुनीता मरसकोल्हे, गीता हिचामी, श्री.मडावी, श्री.आत्राम आदी मान्यवर उपस्थित राहतील. या मेळाव्यानंतर रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होतील. गुरुवारी २२ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता “पेसा कायदा-समज व गैरसमज आणि आरक्षणाची गरज” या विषयावर परिसंवाद होईल. कवी प्रभू राजगडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील, तर अरुण मुनघाटे, महेश राऊत, शालिक मानकर, नाना आत्राम, पेंदाम, डॉ.कैलास नगराळे, डॉ.कांबळे, प्रा.शेषराव येलेकर, प्रा.संजय मगर मार्गदर्शन करतील. दुपारी १२ वाजता आदिवासी देवतांची महापूजा व मार्गदर्शनपर कार्यक्रम होईल. अध्यक्षस्थानी आविसंचे सरसेनापती नंदू नरोटे हे राहतील. देवरीचे आ.संजय पुराम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. यावेळी राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात येईल. याप्रसंगी डॉ.नरेशचंद्र काठोडे हे स्पर्धा परिक्षेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहितीही आ.डॉ.होळी व नरोटे यांनी दिली. पत्रकार परिषदेला आविसंचे अॅड.मोहन पुराम, सुधाकर नाईक उपस्थित होते.