नमो बिअर बार’ला विरोध करणाऱ्या आमदार मेघेवर दंगलीचा गुन्हा

0
21

नागपूर दि. २० – : नागपूरमधल्या ‘नमो बिअर बार’ला विरोध करणारे भाजप आमदार समीर मेघे यांच्या विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. बिअर बारविरोधात त्यांनी आंदोलन केले होते. राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रगती पाटील यांच्यासह २३ महिलांवरही दंगलीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.अनेक दिवसांपासून स्थानिकांचे नागपूरच्या गोधनी गावात नमो बिअर बारला परवानगी दिल्याविरोधात आंदोलन सुरु आहे.

महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र बनवणार का? असा सवाल विरोधी पक्षात असेपर्यंत भाजप नेते सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारत होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर सर्व नियम धाब्यावर बसवून युती सरकारकडून मद्यविक्रीचे परवाने वाटले जात आहेत.

स्थानिक नागरिकांचाविरोध, ग्राम पंचायत आणि ग्राम सभेचे ठराव, पोलिसांचे अहवाल आणि जिल्हाधिकारींचा निर्णय सर्व काही नाकारून नागपुरात ‘नमो बिअर बार’ला मंत्रालयातून परवानगी देण्यात आली आहे. हे लोकशाही विरोधी असल्याचे सांगत स्थानिक महिला गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत.