जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शने

0
8

भंडारा : राज्य शासनाचे स्वस्त धान्य दुकानामधून सर्व पत्रिका शिधापत्रिकांसाठी माफक दरांमध्ये पुरेशा प्रमाणात डाळी उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारला निदर्शने करण्यात आली. शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना निवेदन दिेले.
जिल्हाध्यक्ष जिया पटेल यांच्या नेतृत्वात त्रिमूर्ती चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा भरातील शेकडो काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मार्गदर्शन करताना या पदाधिकार्‍यांनी राज्यासह केंद्र शासनावर टीका केली. यावेळी ते म्हणाले, ऐन दिवाळीच्या तोंडावर डाळीच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. राज्य सरकारने डाळीच्या किमती कमी करण्याचे आश्‍वासन दिले असले तरी सर्व सामान्य नागरिकांना परवडतील इतक्या प्रमाणात किमती कमी झालेल्या नाहीत. बाजारात नागरिकांची जणू लूट सुरु आहे. अच्छे दिनचे स्वप्न दाखविणार्‍या भाजपच्या कार्यकाळात दिवाळीच्या तोंडावर नागरिकांची लूट सुरु झाली आहे.
आंदोलनात जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, समाज कल्याण सभापती नीळकंठ टेकाम, जिल्हा महासचिव प्रेमसागर गणवीर, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, प्रेमदास वनवे, नीळकंठ कायते, प्रमोद तितीरमारे, मोहन पंचभाई, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, माजी सभापती राजकपूर राऊत, माणिक ब्राम्हणकर, शमीम शेख, पृथ्वी तांडेकर, धर्मेंद्र गणवीर, कुंदा वाघाडे, अनिक जमा पटेल, सुनिल लेंडे, एच.एल. लांजेवार, जनार्धन निंबार्ते, प्रसन्ना चकोले, अयुब पटेल, मंगेश हुमणे, प्रेमानंद नखाते यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.