एम्स, आयआयएमला मिळाली जागा

0
4

नागपूर : नागपुरातील मिहान प्रकल्पात स्थापन करण्यात येणाऱ्या ‘एम्स’ आणि ‘आयआयएम’ स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) बुधवारी दोन्ही संस्थांना मिहानमध्ये जागा वाटपाचे पत्र एका छोटेखानी समारंभात सोपविले.

एमएडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांनी हे पत्र एम्सचे प्रतिनिधी व नागपूर एम्सचे नोडल अधिकारी डॉ. रवी चव्हाण आणि आयआयएमचे प्रतिनिधी व प्रकल्प प्रशासक ले. कर्नल (निवृत्त) मकरंद अलूर यांना सोपविले. यावेळी जिल्हाधिकारी आणि एमएडीसीचे संयुक्त संचालक सचिन कुर्वे, एमएडीसीचे सल्लागार (तांत्रिक) एस.व्ही. चहांदे, मुख्य अभियंता एस.के. चॅटर्जी, उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील, अशोक चौधरी, आभा पठाण, एमएडीसीचे वरिष्ठ आर्किटेक्ट सी. बनकर, मार्केटिंग मॅनेजर अतुल ठाकरे, जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी, सहायक नगर रचनाकार दिगांबर लुंगरे आणि सल्लागार (इलेक्ट्रिकल्स) केशव इंगोले प्रामुख्याने उपस्थित होते.

मिहानमध्ये एम्स १५० एकर आणि आयआयएम १४२ एकरमध्ये स्थापन होणार आहे. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत भारत सरकारतर्फे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून एम्सची स्थापना करण्यात येत आहे.