दोन माजी स्थायी समिती सभापतींमध्ये खडाजंगी

0
5

चंद्रपूर दि.२९- मागील सभेतील इतिवृत्त वाचून दाखविणे व त्यातील त्रुट्या दुरुस्त करण्यावरून आजच्या आमसभेत दोन माजी स्थायी समिती सभापतींमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली. अचानक बाचाबाचीवरून प्रकरण वाढत जात असल्याचे पाहून काही नगरसेवकांनी मध्यस्थी करून दोघांमधील वाद मिटविला.

महानगरपालिकेच्या नवीन इमारतीमध्ये बुधवारी दुपारी १ वाजता सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. राष्ट्रगीतानंतर मागील सभेचे इतीवृत्त वाचण्याची सभेत पध्दत आहे. इतीवृत्त वाचत असताना सभापतींच्या वाहन भत्त्याचा विषय समोर आला. यावर नगरसेवक गजानन गावंडे यांनी काही त्रुट्या दाखविल्या. त्यानंतर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती नंदू नागरकर यांनीही यात काही दुरुस्त्या सुचविल्या.

वाहन भत्त्यासाठी नगरसेवक, पदाधिकारी, महापौर व आयुक्तांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी नंदू नागरकर यांनी केली. याबाबत ते महापौर राखी कंचर्लावार यांच्याशी बोलत असताना मनपाचे माजी स्थायी समिती सभापती रामू तिवारी हे सभेत मोठ्याने ओरडत गोंधळ घालू नका, असे म्हणत मधे आले. यावरून नागरकर आणि तिवारी यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. दोघांमधील भांडण वाढत असल्याचे पाहून माजी उपमहापौर संदीप आवारी, अनिल फुलझेले, आकाश साखरकर व काही नगरसेवक यांनी मध्यस्थी करीत दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळानंतर प्रकरण शांत झाले व इतर विषयांवर चर्चा सुरू झाली.