पोंभुर्ण्यात भाजपा; सावलीत काँग्रेस

0
5

चंद्रपूर दि.३-: चिमूर नगर परिषद आणि सावली व पोंभुर्णा नगर पंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी मतमोजणीनंतर जाहीर करण्यात आला. चिमूर नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे. सावली नगरपंचायतीत काँग्रेसने १७ पैकी १० जागांवर विजय मिळवित सत्तेचा मार्ग मोकळा केला आहे तर पोंभुर्णा नगरपंचायतीत भाजपाने १७ पैकी १० जागा पटकावित आपला झेंडा रोवला आहे.

अखेर काँग्रेसने रोवला झेंडा

सावली : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सावली नगर पंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मतदारांनी बहुमताचा कौल दिला. त्यात काँग्रेसचे दहा उमेदवार निवडून आले. आमदार विजय वडेट्टीवार यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते. त्यांनी केलेल्या विकासकामांना मतदारांनीही स्वीकारत काँग्रेसला बहुमतात निवडून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसला पाच जागावर समाधान मानावे लागले. बसपा एक तर अपक्ष एक अशा प्रकारे उमेदवार निवडून आले तर भाजपाच्या खात्यातील एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. त्यामुळे सावली नगरपंचायतीत भाजपाचे पाणीपत झाले आहे.