नागपूरात काँग्रेस राष्ट्रवादीची सरशी

0
13

नागपूर दि.३-: जिल्ह्यातील हिंगणा, कुही, भिवापूर या तीन नगर पंचायत निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला. भाजपने सर्वाधिक १४ जागांवर कब्जा केला असला तरी कुठेच बहुमत प्राप्त करता आले नाही. काँग्रेसने १३ जागा मिळवित पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले. दुसरीकडे हिंगण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत प्राप्त केले. राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असे दिग्गज असताना त्यांच्याच गृहजिल्ह्यात या निवडणुकीत भाजपला ‘जोर का धक्का’ बसला. त्यासोबतच भिवापुरात बसपाने मुसंडी मारली.

उमरेड विधानसभा मतदारसंघातील कुही आणि भिवापूर तर हिंगणा मतदारसंघातील हिंगणा नगर पंचायतची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होती. त्यासाठी स्थानिक नेत्यांसह दिग्गज नेत्यांनी निवडणूक प्रचारात रंगत आणली. विशेष म्हणजे, मतदानाची टक्केवारी वाढल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांना निकालाबाबत धाकधूक होती. निकाल जाहीर होताच काहींसाठी तो धक्का तर काहींना दिलासा देणारा ठरला. कुही नगर पंचायतमध्ये सर्वाधिक आठ जागा काँग्रेसच्या ताब्यात गेल्या. त्याखालोखाल पाच जागा भाजपकडे गेल्या. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात प्रत्येकी एक जागा आली. अपक्षांनी दोन जागांवर विजय मिळविला. कुहीत सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला एका सदस्याची गरज असून तेथे सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा आहे.