बळीराजा सन्मान जागृती महोत्सव

0
18

वर्धा :दि. १३ बलिप्रतिपदेच्या निमित्ताने गुरुवारी वर्धेत विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने बळीराजा सन्मान जागृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सकाळी शिवाजी चौकातून स्कूटर रॅली काढण्यात आली. ही रॅली आर्वी नाका, वंजारी चौक, सोशालिस्ट चौक येथून बजाज चौकात विसजिर्त झाली.
समारोपीय कार्यक्रमात उपस्थितांनी विचार मांडले. गजेंद्र सुरकार यांनी तरुणांच्या लक्षणीय सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला. संजय जवादे यांनी तरुणांनी चुकीचे विचार आत्मसात करण्याऐवजी अशा प्रकारे शेतकर्‍यांच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले. सुभाष खंडारे यांनी प्रतिगामी विचार हे लोकांना भ्रमित करतात, त्यांच्या विचारांना दूर सारण्याचे आवाहन केले. प्रा. नूतन माळवी यांनी महात्मा फुले यांनी बळीराजावर लिखान केले आहे. तसेच डॉ. आ.ह. साळुंखे यांनी आपल्या ‘बळीवंश’ या ग्रंथाच्या मांडणीमधून बळीराजावर वैदिकांनी केलेल्या अन्याय तसेच आजच्या स्त्रियांनी शेणाचा बळीराजा करून त्यास पायांनी न तुडविता त्याचे पूजन करण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमात मराठा सेवा संघ, सत्यशोधक समाज संघटना, अंनिस, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, किसान अधिकार अभियान, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, चेतना एज्यूकेशन सोसायटी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, आदिवासी विद्यार्थी संघटना, गुरूदेव सेवा मंडळ, बहुजन संघर्ष समिती, बामसेफ इत्यादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.