कामांत कसूर, गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करा-खा. मेंढेंचे निर्देश

0
78

गोंदिया-शासनाच्या विविध योजनांद्वारे लोकहिताची कामे होतात. मात्र अलिकडे या कामांमध्ये गैरप्रकाराच्या तक्रारी होत आहेत. कामांत कसूर, गैरप्रकार करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे निर्देश खा. सुनिल मेंढे यांनी दिले. जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या अनुषंगाने विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार सुनील मेंढे यांनी शुक्रवार 27 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद गोंदिया येथे बैठक घेतली. त्या प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या कक्षात झालेल्या बैठकीत ग्रामीण भागातील विकासाच्या विविध योजना आणि उपक्रमांच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भात यापूर्वीच्या बैठकीत आलेल्या तक्रारींचा आढावा घेतल्यानंतर जनसामान्यांच्या योजना राबविताना गैरव्यवहार करणार्‍या अधिकार्‍यांविरोधात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले
घरकुल ब व ड यादी संदर्भात चर्चा करण्यात आली. जे लाभार्थी पात्र असूनही त्यांची नाव यादीत नाहीत याला कारणीभूत असलेल्यांवर कडक कार्यवाही करावी असेही यावेळी मेंढे म्हणाले. गरिब व गरजूंना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी योजना आहे. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी जबाबदारीने काम करावे असा सल्लाही मेंढेनी उपस्थित अधिकारी, कर्मचार्‍यांना दिला. घरकुलासाठी मोफत दिली जाणारी पाच ब्रास रेती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते की नाही याचा आढावा घेण्याचे सूचीत केले. जिल्ह्यात सुरू असलेल्या कोविड लसीकरण संदर्भात मेंढेंनी माहिती जाणून घेतली. दलीत वस्ती योजना प्रभावीपणे राबवून या वसतीमधेच ही योजना प्राधान्याने राबवून मुबलक सोईसुविधा दर्जेदार व्हाव्या व भ्रष्टाचार करणार्‍याची गय केली जाणार नाही याकडे अधिकार्‍यांनी विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. सिंचन योजना, 15 वा वित्त आयोगाचा निधी ग्रामविकासाकरिता खर्च करण्यावर चर्चा झाली.
दवनिवाडा येथील समाजभवन व संरक्षण भिंतीच्या बांधकामात झालेल्या गैरव्यवहाराचा संदर्भात चौकशी अहवाल 3 दिवसांत सादर करण्याचे निर्देशही यावेळी मेंढेंनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मुंदडा यांना दिले. बैठकीला माजी जि. प. अध्यक्ष नेतराम कटरे, भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री संजय कुळकर्णी, जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष संजय टेंभरे, रचना गहाणे, जिल्हा उपाध्यक्ष नंदू बिसेन, भाजपा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष ओम कटरे, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी भांडारकर, गणवीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, खंडविकास अधिकारी गोंदिया, गोरेगाव, तिरोडा व इतर अधिकारी उपस्थित होते.