‘रोहयो’ कामांचा गावनिहाय शास्त्रशुद्ध आराखडा तयार करावा-  अपर मुख्य सचिव नंदकुमार

0
22
  • प्रत्येक शेताला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट
  • प्रत्येक कुटुंबाला लखपती बनविण्यासाठी काम करण्याच्या सूचना

वाशिम, दि. ०४ : जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब लखपती होण्यासाठी शेतीतील उत्पन्नात वाढ होणे आवश्यक आहे. याकरिता प्रत्येक शेताला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून करावयाच्या कामांचा गावनिहाय तंत्रशुद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना मृद व जलसंधारण, रोजगार हमी योजना विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी दिल्या. जिल्ह्यातील रोहयो कामांचा आढावा घेण्यासाठी आज, ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, श्री. दांगट, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मापारी यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

श्री. नंदकुमार म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब लखपती बनविण्याचे उद्दिष्ट ठेवून ‘मनरेगा’च्या माध्यमातून कामे करावीत. वाशिम हा आकांक्षित जिल्हा असून शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब लखपती बनविण्यासाठी शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. ‘मनरेगा’ अंतर्गत जलसंधारणाची कामे करून गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गावातच थांबिण्याचे नियोजन करावे. जेणेकरून प्रत्येक शेतीला सिंचनाची सुविधा निर्माण होवून उत्पन्न वाढीस मदत होईल. या अनुषंगाने गावनिहाय ‘जीएसआय’ आधारित आराखडा तयार करावा. पहिल्या टप्प्यात ‘क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट’ अंतर्गत निवड झालेल्या मानोरा व मालेगाव तालुक्यातील गावांचे सर्वेक्षण करून आराखडे तयार करावेत. यासोबतच जिल्ह्यात फळबाग लागवड, शेतमालासाठी गोडावून उभारणीसाठी सुद्धा प्रयत्न करावेत.

जिल्ह्यातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्यातील अपूर्ण कामांचे सर्वेक्षण करून त्या कामांच्या सद्यस्थितीविषयक माहिती संकलित करावी. तसेच ही कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी. जिल्ह्यात नवीन जॉब कार्ड तयार करणे, तसेच बंद असलेली जॉब कार्ड कार्यान्वित करण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना श्री. नंदकुमार यांनी यावेळी दिल्या.