मेडिकल मार्ड व स्टुडंट कौन्सिलचा इशारा :४८ तासांत कारवाई करा, अन्यथा आंदोलन

0
7

नागपूर : मेडिकलमधील पदव्युत्तर विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या प्रयत्न प्रकरणी न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांचे उपअधिष्ठातापद काढून घेण्यात आले. बुधवारी एका विद्यार्थिनीकडून लैंगिक छळाची तक्रार आणि गुरुवारी छळवणूक होत असल्याच्या २00 पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन अधिष्ठात्यांना सादर करण्यात आल्याने मेडिकलमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणात निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ व ‘स्टुडंट कौन्सिल मेडिकल कॉलेज’ने पुढाकार घेत ४८ तासांत डॉ. व्यवहारे यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
डॉ. व्यवहारे यांच्या जाचाला कंटाळून त्यांच्याच विभागातील एका पदव्युत्तर (पीजी) विद्यार्थ्याने मंगळवारी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे बयाण दिले. या प्रकरणाला गंभीरतेने घेत मेडिकल प्रशासनाने तत्काळ कॉलेज कौन्सिल बोलवीत डॉ. व्यवहारे यांचे उपअधिष्ठातापद काढून घेतले, तसेच या घटनेवर त्यांना अभिप्राय मागितला. ही घटना ताजी असतानाच बुधवारी त्यांच्याच विभागाच्या एका पीजीच्या विद्याथिर्नीने डॉ. व्यवहारे मानसिक आणि शारीरिक छळ करीत असल्याची लेखी तक्रार अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याकडे केली. गुरुवारी यात ‘स्टुडन्ट कौन्सिल मेडिकल कॉलेज’ही सहभागी झाले. त्यांनी पदवीपूर्व विद्यार्थ्यांचाही डॉ. व्यवहारे छळ करीत असल्याची तक्रार अधिष्ठात्यांकडे केली. यावर २00 विद्यार्थ्यांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत. तक्रारीत डॉ. व्यवहारे यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, परीक्षा विभागातून व विभागप्रमुख पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ४८ तासांत डॉ. व्यवहारे यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. ‘मार्ड’नेही डॉ. व्यवहारे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.