सुप्रशासनासाठी लोकांचा सहभाग महत्वाचा- रत्नाकर गायकवाड

0
17

 

गोंदिया दि, २२ : माहितीचा अधिकार हा क्रांतिकारक कायदा आहे. या कायदयाचा थेट संबंध प्रशासनाशी येतो. लोकांच्या सहभागातून निर्णय घेण्यात येत असल्यामुळे सुप्रशासन स्थापित होण्यासाठी लोकांचा सहभाग महत्वाचा आहे. असे मत राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी व्यक्त केले.
२१ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालययातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित माहितीचा अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत श्री गायकवाड बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री गायकवाड पुढे म्हणाले, लोकांच्या सहभागातून निर्णय घेतले जातात याची माहिती नागरिकांना झाली पाहिजे. भारतात या कायदयाबाबत मोठया प्रमाणात जागृती करण्यात आली आहे. पारदर्शकतेची संस्कृती शासनव्यवस्थेत माहितीचा अधिकार कायदयामुळे येत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कर लोक भरतात. लोकांच्या पैशातून निर्णय घेतले जातात. लोकांचा सहभाग, निर्णय प्रक्रीया व जवाबदारीची भावना प्रशासनात येत आहे.
देशात या कायदयाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अव्वल असल्याचे सांगून श्री गायकवाड म्हणाले, माहितीचा अधिकार कायदयाअंतर्गत माहिती मागणाऱ्या व्यक्तीला ३० दिवसाच्या आतच माहिती दयावी. प्रत्येक विभागाने त्यांच्या संकेतस्थळावर १७ बाबींची माहिती उपलब्ध करुन दयावी. या कायदयामुळे पारदर्शकता आल्याचे सांगून श्री गायकवाड म्हणाले, काही प्रमाणात ब्लॅकमेलींगसुध्दा केली जाते. या कायदयाचा दुरुपयोग कोणीही करु नये. हा कायदा दुधारी शस्त्र आहे. माहितीचा अधिकार कायदयाला चांगले भवितव्य पाहिजे असेल तर व्यक्तिगत माहिती मागू नये असेही ते म्हणाले.
डॉ. सूर्यवंशी म्हणाले, या कायदयाबाबत अनेकामध्ये संभ्रम होता. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन करुन अनेकांचे समाधान केले आहे. या कायदयामुळे पारदर्शकता येऊन भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री लोणकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत प्राप्त अर्ज व त्याबाबत केलेली कार्यवाही याबाबतची माहिती दिली.
यावेळी राज्य मुख्य माहिती आयुक्त श्री रत्नाकर गायकवाड यांनी उपस्थित अधिकाऱ्यांनी या कायदयाच्या अनुषंगाने विचारलेल्या विविध प्रश्नांचे उत्तरे दिली व अधिकाऱ्यांच्या मनातील या कायदयाबाबत असलेली भीती दूर केली. या सभेला विविध विभागाचे अपीलीय अधिकारी, जनमाहिती अधिकारी व सहायक जनमाहिती अधिकारी उपस्थित होते.