असंघटीत कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करुन घ्यावी- अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले

0
43

गोंदिया, दि.11 : असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत ई-श्रम
पोर्टल तयार करण्यात आले आहे. असंघटीत कामगारांना याचा लाभ होणार असल्यामुळे संबंधितांनी जवळच्या
नागरी सुविधा केंद्र (CSC) व जिल्हा कामगार सुविधा केंद्र गोंदिया किंवा eSHRAM Portal URL :
eshram.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले
यांनी केले आहे.
7 ऑक्टोंबरला जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित सभेत मार्गदर्शन
करतांना श्री खवले बोलत होते. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त उज्ज्वल लोया यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अप्पर जिल्हाधिकारी श्री खवले पुढे म्हणाले, असंघटीत कामगार म्हणजे विविध व्यवसाय करणारे जसे की,
बिडी कामगार, मच्छीमार, सुतार कामगार, सेरीकल्चर कामगार, भाजी आणि फळ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, यंत्रमाग
कामगार यांच्यासारख्या विविध 300 व्यवसाय गटातील असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या
उद्देशाने असंघटीत कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. सदर नोंदणी
अंतर्गत असंघटीत कामगारांना युनिव्हर्सल अकाऊंट नंबर दिला जाणार आहे. त्यामुळे ई-श्रम कार्डच्या रुपाने
असंघटीत कामगारांना ओळख मिळणार आहे. असंघटीत कामगारांना याचा लाभ होणार असल्यामुळे जास्तीत जास्त
असंघटीत कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री लोया यावेळी म्हणाले, ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या
कामगाराचे वय 16 ते 59 दरम्यान असावे. कामगार आयकर भरणारा नसावा. कामगार हा कर्मचारी भविष्य निर्वाह
निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसावा. कामगार नोंदणीसाठी आधारकार्ड, बँक पासबुक, सक्रीय
मोबाईल नंबर, स्वयंनोंदणी करण्यासाठी कामगाराचा सक्रीय मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक
आहे असे सांगून श्री लोया पुढे म्हणाले, जिल्ह्यात 1089 नागरी सुविधा केंद्र आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर
474 तसेच ग्रामीण भागामध्ये 446 नागरी सुविधा केंद्र व शहरी भागात 169 नागरी सुविधा केंद्र कार्यरत असून
सद्यस्थितीत गोंदिया जिल्ह्यात ई-श्रम पोर्टलमध्ये 24 हजार 95 असंघटीत कामगार नोंदीत झालेले आहेत असे त्यांनी
सांगितले.
सभेला सरकारी कामगार अधिकारी गुणवंत पंधरे, जिल्हा उपनिबंधक शुध्दोधन कांबळे, जिल्हा माहिती
अधिकारी यांचे प्रतिनिधी के.के.गजभिये, बाल कामगार विभागाचे प्रकल्प संचालक महेंद्र रंगारी, सहाय्यक
मत्स्यविकास अधिकारी एस.एल.शहारे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एच.के.बदर, जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी विजय पांढरे, नागरी सुविधा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक गिरीश रहांगडाले,
नगर परिषदेचे धनराज बनकर, देवरी नगरपंचायतचे विठ्ठल हजारे, उपशिक्षणाधिकारी डी.एम.मालाधरी, जिल्हा
महिला व बालविकास कार्यालयाचे रविंद्र टेंभूर्णे उपस्थित होते.