निर्णय मागे न घेतल्यास मनसे करणार रेलरोको आंदोलन

0
6

गोंदिया,दि. २५ – महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांच्या मार्गदर्शनात येथील  रेल्वे  स्थानकाचे प्रमुख वरिष्ट स्टेशन प्रबंधकाची भेट घेऊन महाराष्ट्र एक्स्प्रेस दुर्ग पर्यंत लांबवण्याचा तीव्र निषेध करण्यात आला. महाराष्ट्र असो किंवा विदर्भ गोंदिया हे महाराष्ट्रातले पहिले मोठे स्थानक आहे. हजारो प्रवाशी येथून ये-जा करतात. अनेक नोकरदार वर्ग, विद्यार्थी तसेच हजारो लिटर दुध नागपूरला या गाडी मार्फत पोचते. स्थानिक आमदार, खासदार मंत्री झोपा काढत आहेत आणि त्यांच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे हाल मात्र गोंदिया च्या जनतेचे होत आहेत. लोकसभा अध्यक्ष यांनी आपल्या पदाचा गैरवापर केलेला असून त्यांनी काहीही विचार न करता रेल्वे मंत्री सोबत संवाद साधून महाराष्ट्र एक्स्प्रेस लांबवली. इतक्या झपाट्याने निर्णय जनतेच्या हिताचे घेतले असते तर शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या. लोकसभा अध्यक्षांनी इकडे नाक खुपसू नये. हा गोंदिया वासियांचा अपमान आहे आणि येत्या निवडणुकांमध्ये त्याचा फरक जाणवेल. आज महाराष्ट्र एक्स्प्रेस नेली उद्या विदर्भ एक्स्प्रेस मागतील. गोंदिया वासियांचे काय होणार? याचा विचार कोणीच करत नसल्याचे मनीष चौरागडे यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

येणाऱ्या २८ तारखेपर्यंत जर हा निर्णय मागे घेण्यात आला नाही आणि  महाराष्ट्र एक्स्प्रेस गोंदिया वरून पूर्ववत झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रेल रोको करून निषेध करेल असे मनीष चौरागडे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच समस्त व्यापारी वर्ग, विद्यार्थी, दैनंदिन ये-जा करणारे नोकरदर वर्गांना या हक्काच्या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन मनसे गोंदिया तर्फे करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी  मनीष चौरागडे, मुकेश मिश्र, सुरेश ठाकरे, यासीन शेख, दिलीप कोसरे, उदय काळे, उदय पोफळी, खेमराज ठाकरे, देवीलाल रावते, यशवंत ठाकरे, भिमोदय वैद्य, गजानन लांजेवार, खेमराज ठाकरे, श्रीनिवास राव आणि अन्य कार्यकते पदाधिकारी उपस्थित होते.