वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळयात

0
11

गडचिरोली, -: आरोग्य विभागातील निलंबित पर्यवेक्षकाच्या तीन महिन्यांच्या निर्वाह भत्त्याच्या बिलावर स्वाक्षरी करुन ते बिल पंचायत समितीकडे सादर करण्यासाठी संबंधित पर्यवेक्षकाकडून ९ हजारांची लाच स्वीकारताना आज सिरोंचा तालुक्यातील टेकडाताला प्राथमिक आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकारी डॉ.सुखदेव माधवराव करेवाड(वर्ग २) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून अटक केली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा टेकडाताला प्राथमिक आरोग्य केंद्रात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होता. परंतु काही कारणास्तव त्याला निलंबित करण्यात आले. पुढे तक्रारकर्त्याला आरोग्य विभागाकडून त्याची ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या निर्वाह भत्त्याची रक्कम घ्यावयाची होती. त्यासाठी बिलावर स्वाक्षरी करुन ते बिल पंचायत समितीकडे सादर करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुखदेव करेवाड याने तक्रारकर्त्याला १० हजार रुपयांची लाच मागितली. शेवटी तडजोडीअंती डॉ.करेवाड ९ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला. मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने २४ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा रचला. यावेळी तक्रारकर्त्याकडून ९ हजार रुपयांची लाच स्वीकारताना डॉ.सुखदेव करेवाड यास पंचांसमक्ष रंगेहाथ पकडून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. याप्रकरणी बामणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुण्यात आला आहे.