डॉ. आंबेडकर हे व्यक्ती नसून विचार आहे — प्रा. सविता बेदरकर

0
16

गोंदिया दि, २६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील एक आदर्श राज्यघटना देशासाठी लिहिली. देशातील सर्व समाजातील घटकांना पूढे ठेऊन त्यांच्या कल्याणासाठी विविध कलमांचा समावेश राज्यघटनेत डॉ. आंबेडकरांनी केले. त्यांनी दूरदृष्टीने लिहिलेल्या या राज्यघटनेमुळे डॉ. बाबासाहेब हे व्यक्ती नसून एक विचारच असल्याचे दिसून येते. असे मत सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सविता बेदरकर यांनी व्यक्त केले.
आज (ता.२६) संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय भवनात सहायक आयुक्त, समाज कल्याण आणि जिल्हा ग्रंथपाल अधिकारी यांच्या संयुक्त वतीने आयोजित कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून श्रीमती बेदरकर बोलत होत्या. उद्घाटक म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अध्यक्षस्थानी सहायक आयुक्त सुनिल जाधव, वक्त्या म्हणून प्रा. कविता राजाभोज यांची तर मंचावर जिल्हा ग्रंथपाल अधिकारी खुमेंद्र बोपचे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्रीमती बेदरकर म्हणाल्या, स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुतेचे तत्व राज्यघटनेत आहे. राज्यघटनेने प्रत्येकाचे अधिकार व स्वातंत्र्य अबाधित ठेवले आहे. ओबीसी बांधवांच्या कल्याणासाठी डॉ. आंबेडकरांनी कलम ३४० लिहून ठेवली आहे. देशात कुटूंब नियोजनाचा पहिला स्विकार डॉ. आंबेडकरांनी केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. श्रीमती राजाभोज म्हणाल्या, स्वातंत्र्यापूर्वीची राज्यघटना ही चार्तुवर्ण पध्दतीवर आधारीत होती. डॉ. आंबेडकरांनी अनेक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करुन भारतीयांच्या कल्याणाची राज्यघटना लिहिली. राज्यघटनेच्या प्रत्येक कलम हे लोककल्याणाचे आहे. डॉ. आंबेडकरांनी राज्यघटनेतून मानवी मुल्यांची जोपासना केली. संविधान दिनाच्या निमित्ताने जास्तीत जास्त लोकांपर्यंत संविधानाची माहिती गेली पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त केली.
उद्घाटक म्हणून बोलतांना श्री खडसे म्हणाले, भारतीय राज्यघटना हा आपला एक ऐतिहासिक ठेवा. राज्यघटनेतील प्रत्येक कलम भारतीयांना उज्वल भविष्याकडे नेणारे दिपस्तंभ आहे. बालपणापासून संविधान वाचले व ते समजून घेतले तर चांगले संस्कार घडण्यास मदत होईल. स्वातंत्र्यानंतर देशाची आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक दिशा काय असावी तर याचे उत्तर भारतीय राज्यघटना आहे. असेही ते म्हणाले.
अध्यक्ष म्हणून बोलतांना श्री जाधव म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठा त्याग करुन राज्यघटना लिहिली. एक आदर्श राज्यघटना म्हणून आपल्या राज्यघटनेकडे जग बघते. संविधान अर्थात राज्यघटना कितीही चांगली असली तरी ती चांगल्याप्रकारे राबविण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी पाहुण्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन केले. प्रा. सविता बेदरकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. कार्यक्रमाला विविध महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य, सामाजिक न्याय भवनातील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रंथालयात स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे युवक-युवती मोठया संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी केले. संचालन समाज कल्याण निरीक्षक अंकुश केदार यांनी मानले.