विधिमंडळ सचिवालय आजपासून नागपुरात

0
8

नागपूर दि. २७ :: ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनासाठी जय्यत तयारी सुरू आहे. मुंबईतील विधिमंडळ सचिवालय शुकवार २७ नोव्हेंबर रोजी नागपुरात दाखल होत आहे.

अधिवेशनाची पूर्वतयारी म्हणून विधानभवन तसेच रविभवन परिसरात विविध कामांना सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मुंबईहून १५ ट्रक्ससह साहित्य नागपुरात दाखल होईल. अधिवेशनासाठी मुंबईतील ८० टक्के स्टाफ हा नागपुरात दाखल होतो. नागपुरात होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. राज्य सरकार नागपुरात येणार असल्याने तयारी जोरात सुरू आहे. अधिवेशन काळात सरकारच नागपुरात येत असल्याने विविध विभागांच्या फाईल्ससह महत्त्वाची कागदपत्रे नागपुरात आणली जातात. अधिवेशन ७ तारखेपासून सुरू होत असले तरी सचिवालय त्यापूर्वीच आपल्या कामकाजाला सुरुवात करते. २७ नोव्हेंबरपासून या कामकाजाला सुरुवात होईल. गुरुवारी कर्मचारी मुंबईहून रवाना झाले असल्याचे विधिमंडळातील सूत्रांनी सांगितले.

सचिवालयातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या व्यवस्थेची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. यादृष्टीने नागभवन कॉटेज व आमदार निवास तसेच १६० खोल्यांच्या गाळ्यांमध्ये पाणी, वीज व स्वच्छता आदी व्यवस्था करण्यात येत आहे. विधानभवनात नागपूर विधान मंडळ सचिवालय परिसर, विधान मंडळ सुरक्षा व्यवस्था, सचिवालय खानपान व्यवस्था, मंत्री व आमदार यांच्या निवासाची व्यवस्था केली जात आहे.