देवरी नगरपंचात अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सुमन बिसेन

0
11

देवरी,दि.२७ : नव्याने स्थापित झालेल्या देवरी नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती झाली. अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन बिसेन तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ओमप्रकाश रामटेके विजयी झालेत. १७ सदस्य संख्या असलेल्या देवरी नगर पंचायतीत अध्यक्ष पदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस युतीचे उमेदवार सुमन बिसेन तर देवरी विकास मंच व भाजप युतीचे उमेदवार कांता भेलावे यांनी अर्ज सादर केले होते. उपाध्यक्षपदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस युतीचे उमेदवार ओमप्रकाश रामटेके तर देवरी विकास मंंच व भाजप युतीचे उमेदवार यादोराव पंचमवार यांनी अर्ज सादर केले होते. अटीतटीच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आणि देवरी नगर विकास मंच व भाजप युतीला ९-८ प्रमाणे मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत देवरी तालुक्यात तीन ठिकाणी सत्ता बळकावली. निडणुक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुनील सुर्यवंशी, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संजय नागतिळक आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात पार पडली. या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसतर्फे देवरीत विजय मिरवणूक काढण्यात आली.