अर्जुनीत अध्यक्षपदी काँग्रेसच्या शहारे तर भाजपचे कापगते उपाध्यक्ष

0
10

 

अर्जुनी मोरगाव दि. २ : येथील नगर पंचायतमध्ये अध्यक्षपदी काँग्रेसच्या पौर्णिमा कृष्णा शहारे यांची अविरोध तर उपाध्यक्षपदी भाजपचे विजय नामदेव कापगते यांची निवड झाली. नगर पंचायतवर कोणता पक्ष सत्ता स्थापन करणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अध्यक्षपद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव होते. या प्रवर्गातून निवडून आलेल्या चारही महिला उमेदवार केवळ काँग्रेसजवळ होत्या. त्यामुळे अध्यक्षपद काबीज करण्यासाठी काँग्रेसला कसरत करावी लागली नाही. तरी सुद्धा काँग्रेसने पक्षाचे सहा व एका अपक्षाला हाताशी धरुन सहल घडवून आणली होती. उपाध्यक्ष तसेच विषय समित्यांचे सभापती आपल्याच पक्षाचे असावेत. या दृष्टीने आ.गोपालदास अग्रवाल यांनी अपक्ष उमेदवार माणिक घनाडे व यमू ब्राम्हणकर यांना हाताशी धरले होते. मात्र शिवसेना उमेदवार ममता पवार यांची मनधरणी करण्यात काँग्रेसला यश आले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवून सत्ता स्थापन करण्याचे काँग्रेसचे मनसुबे अखेर तसेच राहिले. त्यांची चाणाक्ष रणनिती अखेर असफल ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसने उपाध्यक्ष निवडीदरम्यान मोलाची भूमिका पार पाडली. त्यांनी शिवसेना उमेदवाराला आपल्या तंबूत खेचले व काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्यास त्यांना सांगितले होते. मात्र दोन्ही उमेदवारांनी भाजपाला सहकार्य केले.
भाजपातर्फे विजय कापगते व काँग्रेसतर्फे किशोर शहारे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. यात कापगते यांना ९ तर शहारे यांना ८ मते मिळाली. ही निवडणूक हात उंचावून पार पडली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय दंडाधिकारी के.एन.के. राव व तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी कामकाज पाहिले.

राष्ट्रवादीने केले भाडांरकरला सहा वर्षासाठी निलबिंत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्जुनी मोरगाव येथील पदाधिकारी हेमंत भांडारकर यांना नगर पंचायत निवडणुकीत पक्षादेशाचे उल्लंघन केल्याबद्दल पक्षातून ६ वर्षाकरिता निलंबित करण्यात आले. येथे उपाध्यक्षपदाकरिता राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार किशोर सहारे यांना मतदान करण्याचा पक्षादेश जारी केला होता. परंतू पदाधिकारी हेमंत भांडारकर यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही नगरसेवकांची दिशाभूल करीत त्यांना भाजपच्या उमेदवाराला मतदार करण्यास भाग पाडले. परिणामी भाजप उमेदवाराचा विजय झाला. त्यामुळे राकाँचे वरिष्ठ पदाधिकारी नरेश माहेश्‍वरी आणि माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांच्याशी चर्चा करून भांडारकर यांना निलंबित करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांनी कळविले.