मँगनिज उत्खनन बंदीचा फज्जा : वनविभाग, महसूल व पोलीस विभागाचे दुर्लक्ष

0
16

तुमसर दि. २८ : : मॅग्निज उत्खननावर बंदी असली तरी, तुमसर व मोहाडी तालुक्यात महसूल आणि वनविभागाच्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे. मॅग्निज माफियांचा तालुक्यात प्रचंड सुळसुळाट झाला असून, जिल्हा प्रशासन मात्र कुठलीही कारवाई करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. चोरीच्या मॅग्निजची नागपूर जिल्ह्यात वाहतूक करण्यात येत आहे. यात वनविभाग, पोलिस व महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांचा आशिर्वाद असल्याची चर्चा आहे. तुमसर वनक्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर मॅग्निजचे उत्खनन सुरू आहे. वनक्षेत्राच्या रक्षणाची जबाबदारी असलेले वनकर्मचारी व क्षेत्रसहाय्यकांच्या नजरेसमोर अशाप्रकारे उत्खनन सुरू आहे. चोरट्या मार्गाने मॅग्निजच्या खडकाची रात्रीच्या वेळी रामटेकडे वाहतूक केली जाते. रात्रीच्या वेळी हे मॅग्निज ट्रकद्वारे नागपूर जिल्ह्यात पाठविले जाते. जंगलातून खनिजाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर वन विभागाच्या कार्यालयासमोरून जातात. परंतु, त्यांची साधी चौकशीही केली जात नाही. परिसरात वन व महसूल विभागाच्या जागेत अवैधपणे मॅग्निज उत्खनन करण्यावर शासनाने बंदी घातली आहे. मात्र, हा आदेश पायदळी तुडवून मॅग्निजची चोरी सुरु आहे. यामुळे महसूल व वनविभागाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तालुक्यात राजरोसपणे होत असलेल्या मॅग्नीज चोरीत वन, महसूल, पोलिस विभागाचे अधिकारी व राजकीय क्षेत्रातील नेत्यांचे संगनमत असल्याने मॅग्निज चोरीला ऊत आला आहे.