सावकारी कर्जमुक्ती ७८४ शेतकऱ्यांचे ९२ लक्ष ८४ हजारांचे कर्जमाफ

0
9

जिल्ह्यात आतापर्यंत १४६६ शेतकऱ्यांचे १ कोटी ६० लक्ष ४७ हजार ९२४ रुपयांचे कर्जमाफ
गोंदिया,दि.९ : विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जास माफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले आहे अशा प्रस्तावाची छाननी करुन मंजूरी देण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले. बैठकीला पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी प्रविण नावडकर, समितीचे सदस्‍य सचिव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा सावकाराचे निबंधक दिग्वीजय आहेर, जिल्हा विशेष लेखा परिक्षक सुपे, तिरोडाचे सहायक निबंधक ए.बी.गोस्वामी उपस्थित होते.
संबंधित बैठकीमध्ये तिरोडा तालुक्यातील ३१५ प्रस्ताव, सडक अर्जुनी तालुक्यातील १०५ प्रस्ताव, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ११३ प्रस्ताव, आमगाव तालुक्यातील १७४ प्रस्ताव व गोरेगाव तालुक्यातील ७७ प्रस्ताव अशा एकूण ७८४ प्रस्तावांची छाननी करुन मंजूरी देण्यात आली. मंजूरी देण्यात आलेल्या कर्जमाफीच्या प्रस्तावाची रक्कम ९२ लक्ष ८४ हजार ३१० रुपये एवढी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १४६६ शेतकरी बांधवांना १ कोटी ६० लक्ष ४७ हजार ९२४ रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत तिरोडा तालुक्यातील एकूण ५१६, अर्जुनी मोरगाव येथील ५९४, सडक अर्जुनी येथील १०५, गोरेगाव येथील ७७ व आमगाव तालुक्यातील १७४ अशा एकूण १४६६ शेतकरी बांधवांचे १ कोटी ६० लक्ष ४७ हजार ९२४ रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे.
ज्या सावकारांनी कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफीचे प्रस्ताव अद्याप सहायक निबंधक कार्यालयामध्ये सादर केले नाही त्यांनी आपले प्रस्ताव सादर करावे व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
या योजनेचा लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांनी ३० नोव्हेंबर २०१४ पूर्वी अर्ज घेतले असावे व ते आजपर्यंत थकीत असावे. कर्जदार शेतकरी सातबारा धारक आसावा. ज्या सावकाराकडून कर्ज घेतले आहे तो सावकार महाराष्ट् सावकार नियमन अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार परवानाधारक असणे आवश्यक आहे. अशी माहिती सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक यांनी दिली.