शेतकरी बांधवांसाठी राष्ट्रीय कृषि विमा योजना रब्बी हंगाम-2015

0
13

 

गोंदिया,दि.9 : शेतकरी बांधवांसाठी राष्ट्रीय कृषि विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांनी गहु (बागा), (जिरा) व हरभरा पिकाकरीता 31 डिसेंबर 2015 पर्यंत तर उन्हाळी भात पिकाकरीता 31 मार्च 2016 पर्यंत प्रस्ताव सादर करावे.

कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांकरीता ही योजना ऐच्छिक स्वरुपाची असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सर्वसाधारण व अतिरिक्त संरक्षण विमा, सरासरी उत्पन्नाच्या 150 टक्क्यांपर्यंत पीक विमा उतरविता येईल. या योजनेस अल्प व अत्यल्प भूधारकाचे विमा हफ्त्यामध्ये 10 टक्के सबसिडी देण्यात येत आहे. अधिसूचित पिकांचे मागील 3 ते 5 वर्षाचे सरासरी उत्पन्न आणि त्या पिकाचा जोखीम स्तर विचारात घेऊनच नुकसान भरपाई निश्चित करण्यात येईल. पूर, चक्रीवादळ, भूसखलन व गारपीट या नैसर्गीक आपत्तीमुळे होणारे नुकसान हे भारतीय कृषि विमा कंपनीकडून वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत 48 तासात नुकसानग्रस्त अधिसूचित पिकाची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कंपनीस कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल कार्यालयाच्या मदतीने नुकसान भरपाईचे प्रमाण निश्चित करेल. योजनेच्या अधिक माहितीकरीता राष्ट्रीयकृत बँक/कृषि विभागाचे मंडळ कृषी अधिकारी/तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.