माणसानी माणसाशी माणसासारखे वागावे – डॉ.विजय सूर्यवशी

0
19

मानवी हक्क दिन कार्यक्रम
गोंदिया,दि.१० : समाजात एकोपा कायम राहण्यासाठी माणसानी माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे. असे मत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज (ता.१०) मानवी हक्क दिनानिमीत्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात डॉ.सूर्यवंशी अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून सहायक धर्मदाय आयुक्त ममता रेहपाडे, जिल्हा सरकारी वकील श्री.चांदवानी, सहायक जिल्हा सरकारी वकील शबाना अंसारी, सरकारी अभियोक्ता श्री.नरखेडकर व प्रा. व्ही.डी.मेश्राम यांची उपस्थिती होती.
डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, मानवी हक्काची चांगली अंमलबजावणी केली तरच आपण मानवी हक्क जपले असे म्हणता येईल. मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ मधील कलम १२ अन्वये मानवी हक्काबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्यामुळे यावर सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
श्रीमती रेहपाडे म्हणाल्या, अज्ञान ही अन्यायाची जननी आहे. मानवाचे हक्क काय आहेत हे आपण जाणून घेतले पाहिजे. आपल्याला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कायदयाची गरज आहे. मानवी हक्काचे उल्लंघन होऊ नये म्हणून सर्वांना शिक्षण, संरक्षण व हक्क दिलेले आहेत. त्यासाठी सर्वांनी कायदयाचे ज्ञान ठेवून जागृत असणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या.
श्री. नरखेडकर म्हणाले, प्रत्येकाला समानतेचा हक्क आहे. आपल्या हक्काची जाणीव असली पाहिजे. कायदयाने दोषी ठरविल्याशिवाय शिक्षा देता येणार नाही. यासाठी प्रत्येकाला कायदयाचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
प्रा.मेश्राम म्हणाले, प्रत्येकाला जगण्यासाठी आचारसंहिता दिली जाते. त्यासाठी आपली मानसिकता बदलविण्याची गरज आहे. प्रत्येकाला कायदयाची जाणीव असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सरकारी वकील श्री.चांदवानी व सहायक जिल्हा सरकारी वकील शबाना अंसारी यांनीही समायोचित मार्गदर्शन केले.
यावेळी विविध विभागाचे कार्यालय प्रमुख, कर्मचारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी मानले.