ओबीसी कृती समितीने केले गडचिरोलीत धरणे आंदोलन

0
7

गडचिरोली, दि.१०: ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणे, त्यांची स्वतंत्र जनगणना करणे, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करणे या व अन्य मागण्यांसाठी आज ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधण्यात आले.ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, फ्रीशिपसाठी उत्पन्नमर्यादा ६ लाख रुपये करण्याच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करावी, केंद्र व राज्य सरकारच्या अंदाजपत्रकात ओबीसींचे स्वतंत्र बजेट सादर करावे, वर्ग ३ व वर्ग ४ च्या नोकरभरतीविषयक अधिसूचनेत बदल करुन स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

राज्य घटनेच्या ३४० कलमान्वये ओबीसींना घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. परंतु त्या दर्जानुसार त्यांना हक्क व अधिकार देण्यात येत नाहीत. ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याचेही अमान्य करण्यात येत आहे. परिणामी ओबीसींचा विकास खुंटला आहे. या बाबींच्या निषेधार्थ आजचे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष अरुण पाटील मुनघाटे, अनिल पाटील म्हशाखेत्री, प्रा.शेषराव येलेकर, प्रशांत वाघरे, रमेश भुरसे, महेंद्र ब्राम्हणवाडे, पंकज गुड्डेवार,पांडुरंग घोटेकर, नारायण म्हस्के, दादा चुधरी, विजय वैरागडे, पंडितराव पुडके, पुरुषोत्तम म्हस्के, विनायक बांदूरकर, संजय निशाने, नामदेव उडाण, रजनीकांत मोटघरे, रवी वासेकर, गोविंदराव बानबले, सिद्धार्थ नंदेश्वर, रुमाजी भांडेकर यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.