गडचिरोलीतील खुल्या कारागृहाचे उद्घाटन!

0
13

गडचिरोली, दि.९:  येथील इंदाळा गावानजीक असलेल्या  बहुप्रतीक्षित खुल्या कारागृहाचे औपचारिक उद्घाटन जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या हस्ते बुधवारी सकाळी करण्यात आले. खुले कारागृह संकल्पनेतील हे राज्यातील तिसरे कारागृह आहे. चार दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गृहविभागाला जाब विचारल्यानंतर  घाईघाईने कारागृहाचे उद्घाटन करण्यात आले.

 या उद्घाटन समारंभास पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कुंभार तसेच कारागृह अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले व तुरुंगाधिकारी बी. सी. निमगडे उपस्थित होते. या  कारागृहात सध्या मोर्शी येथील खुल्या कारागृहामधील ९ कैद्यांना स्थानांतरीत करण्यात आलेले आहे.  या स्वरुपाचे आणखी एक कारागृह औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे.  चांगल्या वर्तणुकीच्या सात वर्ष पूर्ण झालेल्या कैद्यांना अशा स्वरुपाच्या कारागृहात ठेवण्यात येते. येथे हे कैदी शेती किंवा तत्सम कामे करु शकतात. या कार्यक्रमासाठी राज्याचे कारागृह महानिरीक्षक  भूषणकुमार उपाध्याय व कारागृह उपमहानिरीक्षक देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

 गडचिरोली शहरातील आम जनतेच्या कपडयांना इस्त्री करणे, शेतीचे काम, व  रोजगाराकरिता कौशल्य विकास प्रशिक्षणसुध्दा याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती कारागृह अधीक्षक श्री.ढोले यांनी दिली. या ठिकाणी एकूण १२ कर्मचारी कामावर असणार आहेत. हे कारागृह केव्हा सुरु होणार, याविषयी जिल्हावासीयांची उत्सुकता असतानाच मीडिया व सामाजिक कार्यकर्त्यांना कुठलीही कल्पना न देतागुपचूप उद्घाटन आटोपण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.