कवलेवाडा प्रकल्पग्रस्तांना अतिरिक्त मोबदला

0
9

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील अदानी वीज प्रकल्पासाठी ज्यांच्या शेतातून पाईपलाईन गेली त्या कवलेवाड्यातील २० शेतकऱ्यांना अखेर प्रशासकीय मध्यस्थीनंतर अतिरिक्त मोबदला देण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे यांनी यात मध्यस्थी करून योग्य तोडगा काढला.

शेतकऱ्यांना एसडीओ महिरे, अदानी प्रकल्पाचे प्रमुख सी.पी. साहू, महाव्यवस्थापक (कॉर्पोरेट अफेअर्स) मोहन पांडे यांच्यासह डॉ.रहांगडाले, शामराव ठाकरे यांच्या उपस्थितीत धनादेश वाटण्यात अले.

अतिरिक्त मोबदल्यासाठी काही लोकांच्या मदतीने शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली होती. अदानी प्रकल्प व्यवस्थापनाने राजकीय नेत्यांसह आंदोलन व शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश न आल्याने जिल्हा प्रशासनाने यात पुढाकार घेऊन प्रकल्पग्रस्तांना न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि झालेल्या करारपत्रानुसार मोबदला देण्याचे सुचविले. मात्र प्रकल्पग्रस्त आपल्या मागणीवर ठाम होते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करून आणि या प्रकरणात केलेल्या करारनाम्याची तपासणी केल्यानंतर उपविभागीय अधिकारी महिरे यांनी किती मोबदला द्यायचा याचा अंतिम निर्णय घेतला. त्यानुसार शेतकऱ्यांना मोबदल्याचे धनादेश तयार करून देण्यात आले.