चार गावात झाली ३३६ शेततळ्यांची निर्मिती

0
10

गडचिरोली : दि. १२-जलयुक्त शिवार अभियानातून लाखो रूपये खर्च करून धानोरा तालुक्यातील तीन व गडचिरोली तालुक्यातील एक अशा चार गावात तब्बल ३३६ शेततळ्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या शेततळे निर्मितीमुळे यंदाच्या खरीप हंगामात शेती सिंचनाची सोय झाली आहे. राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या वतीने टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ सर्वप्रथम राज्याच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जलयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ केला. जलयुक्त शिवार अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यातील १५२ गावांचे निवड करण्यात आली. कृषी, पंचायत समिती वन जिल्हा परिषद सिंचाई, जलसंधारण व जलसंपदा चंद्रपूर या यंत्रणांना जलयुक्त शिवारची कामे वाटप करण्यात आली.
कृषी विभागाला जलसंधारणाची एकूण १ हजार ५७ कामे करावयाची होती. कृषी विभागाच्या वतीने धानोरा तालुक्यातील देऊळगाव, कोकळकसा व कोंदावाही या तीन गावात एकूण २७२ शेततळे बांधले आहेत. तसेच गडचिरोली तालुक्यातील कळमटोला या एकाच गावात ६४ शेततळे बांधण्यात आले आहे. धानोरा तालुक्यातील देऊळगाव येथे ९६, कोकळकसा येथे ९६ व कोंदावाही येथे ६४ शेततळ्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यंदा अत्यल्प पाऊस झाल्या स्थितीतही निर्माण करण्यात आलेल्या शेततळ्यांचा फायदा संबंधित शेतकर्‍यांना झाला आहे. या शेततळ्याच्या माध्यमातून भूजल पातळी वाढल्यामुळे संबंधित शेतकरी भाजीपाल्यासारखे रबी पिकेही घेत आहेत.