शौचालयांसाठी स्टिकरमधून प्रोत्साहन व मूल्यमापन

0
11

गोंदिया :दि .१७- कुटुंबात शौचालय असून त्याचा वापर करणार्‍यांपासून तर शौचालय नसणार्‍या कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना शौचालय बनविण्यास व वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ‘स्टिकर’चा अनोखा प्रयोग सुरू केला आहे. यासाठी कुटुंबांचे वेगवेगळे चार गट पाडून त्यांचे स्टिकर बनविण्यात आले आहेत. कोणत्या कुटुंबात शौचालयांचा कसा वापर होतो हे तपासून त्यानुसार हे स्टिकर त्यांच्या दारावर चिकटविले जात आहे.
यातून शौचालय वापरणार्‍या ‘लय भारी’ कुटुंबांना प्रोत्साहन मिळणार असून न वापरणार्‍यांना शौचालय बनविण्यासाठी आणि वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव एस.एस. कुदळे यांनी रविवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील परसोडी ग्रामपंचायतमध्ये या उपक्रमाची पाहणी केली. काही कुटुंबीयांशी त्यांनी संवाद साधत ज्याच्या घरी शौचालय, ते घर लयभारी, अशा शब्दात त्यांची प्रशंसा करून गावकर्‍यांना प्रोत्साहित केले.
उपसचिव कुदळे यांनी जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम आणि महाराष्ट्र जीवन प्राधीकरणामार्फत चालविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला व प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली.
त्यांच्यासोबत मंत्रालयीन अधिकारी किरण डमाळे, भुजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक ए.एम. काझी, मजीप्राचे ढोमळे, स्वामी, कुपले, गोरेगावचे गटविकास अधिकारी डी.बी. हरिणखेडे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे कार्यक्रम व्यवस्थापक जितेंद्र येरपुडे, समाजशास्त्रज्ञ दिशा मेश्राम, स्वच्छता तज्ज्ञ सूर्यकांत रहमतकर, क्षमता बांधणी तज्ज्ञ देवानंद बोपचे, आयईसी तज्ज्ञ राजेश उखळकर आदींसह पंचायत समिती अर्जुनी मोरगावचे विस्तार अधिकारी वलथरे, बीआरसीचे हेमराज अंबुले, उमेंद्र भगत, परसोडीचे सरपंच अनिल कुंभरे, ग्रामसेवक ढोक व सदस्य उपस्थित होते.जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गावडे यांनी उपसचिव कुदळे यांची भेट घेवून शासनाच्या योजनांविषयी चर्चा केली.