नियोजनाअभावी सारस फेस्टीवल गोंधळी ठरला

0
8

गोंदिया,दि.18 : मोठा गाजावाजा करुन नागझिरा फेस्टीवल साजरा करणारा प्रशासन अखेर सारस फेस्टीवल ला येऊन पोचला.नागझिरा फेस्टीवल तर झालाच नाही परंतु नियोजनाचा अभाव,वन  व वन्यजीव अधिकार्यांचा मनमर्जी कारभार त्यातच पालकमंत्र्याचे नसलेले लक्ष यामुळेच जि्ल्ह्यातील सारस फेस्टीवल आता गोंधळी फेस्टीवल ठरला आहे.जिल्हाधिकारी यांनी नियोजन करुन दिले,परंतु विधानसभेच्या अधिवेशन निमित्ताने विविध विभागाचे प्रधान सचिव मंत्री जिल्ह्याला देत तर काही नाही परंतु बैठकीच्या निमित्ताने वारंवार नागपूरला बोलवत असल्याने त्यांनीही या सारस फेस्टीवलची वाट लावण्यात संधी सोडली नाही.हाच फेस्टीवल चंद्रपूर किंवा पश्चिम महाराष्ट्रात असता तर लाखो रुपयेच नव्हे तर आमदारा खासदार व मंत्रीही अधिवेशन सोडून हजर राहिले असते हे सुध्दा नाकारता येत नाही.

15 डिसेंबर शुभारंभ झालेल्या ‘सारस फेस्टीवल’चा गोंधळ दोन दिवसानंतर अजूनही संपलेला नसल्याचे दिसून येत आहे. या महोत्सवांतर्गत घेण्यात येणाऱ्या ‘फोटो शूट’ स्पर्धेबाबत योग्य ती माहिती मिळत नसल्याने या स्पर्धेत भाग घेण्याचा ठराविक दिवस कोणता हेच कोणाला माहीत नाही. शिवाय या फेस्टीवलची जबाबदारी ज्यांच्यावर देण्यात आली त्यांच्याकडूनही माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने या महोत्सवाचे खरे नियोजन अद्याप झालेलेच नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

आजघडीला धानाचे कोठार म्हणून ख्याती असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पर्यटन विकासाला भरपूर वाव आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाकडून पर्यटन विकासासाठी धडपड करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जिल्ह्यात पर्यटन विकास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचा प्रशासनाचा हेतू आहे.यातूनच जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पर्यटन समितीकडून ‘सारस फेस्टीवल’ची संकल्पना साकारली जात आहे. पण दिड महिना हा महोत्सव चालणार असताना त्याचे नियोजन मात्र अजूनही झालेले नाही.वास्तविक जिल्हाधिकारी धडपड करीत आहेत,परंतु त्यांना साथ देणारा पालकमंत्री हा उत्साही असावा लागताे पालकमंत्रीच उदासीन असेल तर असे कितीही फेस्टीवल अधिकारी नियोजन करतील तरीही यशस्वी होणार नाही.कारण पालकमंत्र्याचे वजन हवे असते याठिकाणी पालकमंत्री एैवजी लघु पालकमंत्री यांचीच डरकाळी अधिक दिसून येते,त्याचाही फटका या नियोजनाला बसला असावा अशी चर्चा आहे.

फोटो शूट स्पर्धेसाठी बाहेरील पक्षी, प्राणी व निसर्गप्रेमी फोटोग्राफर्सकडे संपर्क साधला जात असल्याचे काही निसर्गप्रेमींनी सांगितले. दिड महिने कालावधीच्या या महोत्सवात या फोटोग्राफर्सकडून २५ जानेवारीपर्यंत फोटो मागविण्यात आले आहेत. मात्र स्पर्धेत भाग घेण्यासाठी नोंदणी कधीपर्यंत करायची हे स्पष्ट केलेले नाही. किती जणांनी आतापर्यंत नोंदणी केली हेही सध्या गुलदस्त्यात आहे. स्पर्धकांसाठी किती पुरस्कार राहणार याचीही माहिती नाही. अशा परिस्थितीत या स्पर्धेला किती प्रतिसाद मिळणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.