पोलीस पाटील भरतीचे तिरोडा एसडीओने बदलवले स्वमर्जीने आरक्षण

0
16

गोंदिया : तिरोडा उपविभागीय कार्यालयांतर्गत तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील गावांसाठी ४२ पोलीस पाटील पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. मात्र या पदभरतीला भ्रष्टाचाराचे गालबोट लागल्याचा आरोप करीत सदर पदभरती रद्द करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.विशेष म्हणजे गोरेगाव तालुक्यातील दवडीपार येथील पोलीस पाटील पदासाठी आधी भटक्या विमुक्त जाती प्रवर्गासाठी आरक्षण काढण्यात आले होते.परंतु काहीनी हा प्रवर्ग नसल्याचे एसडीओ कार्यालयाला कळविले.त्याच आधारावर एसडीओ प्रविण महिरे यांनी कुठलीही चौकशी न करता कुणालाही आरक्षण बदलविम्याची सुचना करताच स्वमर्जीने भटक्या विमुक्त जातीसाठी असलेले आरक्षण अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव करुन पदभरतीला सुरु केली.परंतु जेव्हा भटक्या विमुक्त जातीचे लोक यावर आक्षेप नोंदवायला गेले तेव्हा महिरे यांनी त्यांचे आक्षेपावर सुनावनी करता नगरपंचायत निवडणुकीचे कारण करुन टाळाटाळ केली.तसेच त्याच कार्यालयातील लिपिक  यांनीही माहिती अधिकारात साक्षाकिंत माहिती या भरतीसंदर्भात द्यावयास हवी होती परंतु ती माहिती साक्षाकिंत न करताच अर्जदाराला दिल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणने आहे.यावरुन दवडीपार येथील पोलीस पाटील भरतीचे आरक्षण एसडीओ महिरे यांनी जाणीवपुर्वक बदलविल्याचे स्पष्ट होत आहे.जर भटक्या विमुक्त जातीचा उमेदवार नसेल तर सरळ अनु.जातीसाठीच आरक्षीत का व कसे करण्यात आले.आरक्षण हे प्रमाणात करण्यात आल्यानंतर दवडीपार येथील पद हे खुल्या प्रर्वगासाठी राखीव व्हायला हवे होते परंतु तसे झाले नाही.या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी भटक्या विमुक्त संघर्ष समितीने केली असून एसडीओ महिरे यांची भूमिका अशीही ओबीसी विरोधी असल्याचेच दिसून येते.क्रिमिलेयर देण्याची वेळ असो की कुठलेही ओबीसी प्रर्वगाला नेहमीच आडकाठी आणण्याचा प्रयत्न करतात.आत्ता तर त्यांनी चक्क पोलीस पाटील भरतीमध्ये आरक्षणच स्वमर्जीने बदलविले आहे.

तिरोडा उपविभागीय कार्यालयांतर्गत तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील गावांसाठी पोलीस पाटील पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. त्यासाठी एकूण ३२४ अर्ज प्राप्त केले. मात्र या अर्जांची छानणी न करताच  तिरोडा येथील शहीद मिश्रा विद्यालय या केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. परंतु परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले नाही. पेपर कसे सोडवावे याची माहितीसुद्धा देण्यात आली नाही.

परीक्षा झाल्यावर दोन तासांनी निकाल देणे आवश्यक होते. परंतु उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे यांनी निकाल देण्यास चार ते पाच दिवस लावले. त्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाले. उपविभागीय कार्यालयात पोलीस पाटील परीक्षेला निकाल लावण्यात आला. मात्र त्यातही पात्र परीक्षार्थ्यांचे केवळ बैठक क्रमांक देण्यात आले होते. कुणाला किती गुण मिळाले व त्यांची नावेसुद्धा जाहीर करण्यात आले नाही. नंतर दुसऱ्या दिवशी नावांची यादी लावण्यात आली. मात्र गुण दर्शविण्यात आले नाही. तेथील कारकून टेंभुर्णे यांनी लेखी व तोंडी दोन्ही मिळून गुणांची यादी लावण्यात येईल, असे सांगितले होते.

पोलीस पाटील भर्ती २०१५ अंतर्गत गृहविभागाच्या परिपत्रकानुसार (शासन निर्णय-बी.व्ही.पी. १११३/१७६७/प्रक्र५९२/दि.२२ आॅगस्ट २०१४) पोलीस पाटील पदासाठी दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित ८० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ही परीक्षा वस्तूनिष्ट व बहुपर्यायी स्वरूपाची राहील. त्यात सामान्य ज्ञान, गणित, स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांचा समावेश, असे स्वरूप आहे. पण गोंदिया जिल्ह्याचे केवळ पाच प्रश्न दिले, चालू घडामोडीवर केवळ दोन ते तीन व इतर सर्व प्रश्न गणित, इंग्रजी, मराठी व्याकरण व महाराष्ट्र स्तराचे होते. पोलीस पाटील पदासाठी इंग्रजी विषय नसतानाही त्यात चार प्रश्न इंग्रजीचे होते.