नागपुरात भव्य सांस्कृतिक भवन उभारणार – एकनाथराव खडसे

0
12

नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नागपूर येथे पटवर्धन मैदानावर भव्य सांस्कृतिक भवन (शोध केंद्र) उभारणार असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत दिली.विधानपरिषदेचे सदस्य सर्वश्री प्रकाश गजभिये, प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना महसूल मंत्री बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, या सांस्कृतिक भवनासंदर्भात नागपूर महापालिकेने यशवंत स्टेडियमसमोरील पटवर्धन मैदानावर हे भवन बांधण्यास्तव उपयोगात येणारी जागा उपलब्ध करुन देण्यास मंजूरी प्रदान करण्याविषयी ठराव पारित केला होता. मात्र या जागेचा वापर महापालिकेतर्फे इतर प्रयोजनाकरिता होत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका जनहित याचिकेत अंतरिम आदेश पारित करुन शर्तभंगाची कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यासोबतच महानगरपालिकेस देण्यात आलेली जागा सरकारजमा का करु नये याबाबत उच्च न्यायालयाने महापालिकेकडून खुलासा मागविला होता. महानगरपालिकेच्या खुलाशानंतर जिल्हाधिकारी, नागपूर यांनी या जमिनीच्या भाडेपट्टयाच्या नुतनीकरणाबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला असून यासंबंधीच्या जनहित याचिकेत न्यायालयाने दिलेले निर्देश विचारात घेऊन सविस्तर अभिप्राय सादर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

न्यायालयीन बाबींचा अडसर नसेल तर इतर सर्व अडचणी राज्य शासन आपला विशेषाधिकार वापरुन या मैदानावर भव्य सांस्कृतिक भवन उभारणार असल्याचे श्री.खडसे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन नगरविकास विभागाला तसे निर्देशही दिले असल्याचे श्री.खडसे यांनी सांगितले.