पालकमंत्र्यांच्या हस्ते २० डिसेंबरला गोंदिया सारस फेस्टीव्हलचा शुभारंभ

0
10

 

गोंदिया, दि.१८ : राज्यात केवळ गोंदिया जिल्हयात आढळून येणाऱ्या सर्वात मोठ्या सारस पक्षांच्या संवर्धनासाठी आणि जास्तीत जास्त पर्यटक या पक्षांना बघावयास जिल्हयात यावेत यासाठी जिल्हा पर्यटन विकास समितीच्या वतीने १५ डिसेंबर ते २०१५ ते ३१ जानेवारी २०१६ या कालावधीत सारस फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. १५ डिसेंबरपासून अनेक पक्षीप्रेमींची व पर्यटकांची पाऊले सारस बघण्यासाठी परसवाडा, झिलमीली, बाघ व वैनगंगा नदीच्या किनाऱ्याकडे वळली आहे.
गोंदिया येथील बालाघाट मार्गावर असलेल्या हॉटेल गेटवे येथे सारस फेस्टीव्हलचा शुभारंभ रविवार दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा उषा मेंढे, खासदार नाना पटोले, आमदार सर्वश्री राजेंद्र जैन, गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, गोंदिया नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, उपवनसंरक्षक डॉ जितेंद्र रामगावकर, प्रसिध्द वन्यजीव छायाचित्रकार सुधीर शिवराम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर छायाचित्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेमध्ये प्रसिध्द वन्यजीव छायाचित्रकार सुधीर शिवराम हे मार्गदर्शन करणार आहे. यावेळी सारस संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या शेतकऱ्यांचा व स्वयंसेवकांचा सारस मित्र म्हणून पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. सारस फेस्टीव्हीलच्या आयोजनासाठी वन्यजीव प्रेमी, हौसी व वन्यजीव छायाचित्रकार यांचे सहकार्य मिळाले आहे.