‘विदर्भ’च्या थांब्यासाठी प्रसंगी आंदोलन करणार

0
30

तिरोडा दि.२-गोंदिया वरून सुटणार्‍या विदर्भ एक्स्प्रेसचा थांबा तिरोडा रेल्वे ेस्थानकावर देण्यासाठी अनेक दिवसांपासून रेल्वे अधिकार्‍यांशी चर्चा सुरू आहे. मात्र रेल्वे अधिकार्‍यांच्या अडेलतट्ट धोरणा मुळे थांबा मिळू शकला नाही. १५ जानेवारी पर्यंत थांबा न दिल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार विजय रहांगडाले यांनी दिला आहे.
तिरोडा येथे विदर्भ एक्स्प्रेसचा थांबा देण्याबाबत गोंदिया रेल्वे स्थानकाच्या अधिकार्‍यांशी अनेक वेळा चर्चा करून वारंवार निवेदन सुद्धा देण्यात आले. परंतु अनावश्यक कारणे पुढे करून रेल्वे प्रशासन भूलथापा देऊन तिरोडा रेल्वे स्थानकावर विदर्भ एक्स्प्रेसचा थांबा देण्यास टाळाटाळ करीत आहे. तिरोडा रेल्वे स्थानकावरून मोठय़ा प्रमाणात प्रवाशी नागपूर व मुंबई कडे जातात. क्षेत्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षणा साठी मोठय़ा शहराकडे जातात. त्यांना जाणे-येणे करण्यासाठी ही रेल्वेगाडी सोयीची आहे. त्यामुळे विदर्भ एक्स्प्रेस गाडीला तिरोडा येथे दोन मिनिटांचा थांबा देणे गरजेचे आहे. या बाबत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. नाना पटोले यांच्यासह रेल्वेच्या प्रशासकीय अधिकार्‍यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. तिरोडा रेल्वे स्थानकाला ‘ई’ श्रेणीमध्ये ठेवून कमी उत्पन्नाचा दर्जा देऊन थांबा देण्यासाठी नाकारले जात आहे. मात्र, धामणगाव व चांदूर या सारख्या रेल्वे स्थानकांवर या गाडीला थांबा दिला जात आहे. त्यामुळे तिरोडा येथे दोन मिनिटांचा थांबा दिल्यास गोंदिया येथून सुटणारी गाडी दोन मिनिटापूर्वी सोडल्यास वेळा पत्रकात बदल करण्याची गरज पडणार नाही व रेल्वेचे उत्पन्न वाढ होण्यास मदत होईल. १५ जानेवारी पूर्वी तिरोडा येथे विदर्भ एक्सप्रेसचा थांबा मंजूर करावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार रहांगडाले यांनी दिला आहे.