सकारात्मक पत्रकारितेतून समस्यांची सोडवणूक- खुमेंद्र बोपचे

0
12

पत्रकार दिन साजरा
गोंदिया,दि.६ : प्रसारमाध्यमे हे समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचा आरसा आहे. सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून प्रसारमाध्यमे ही समाजातील विविध प्रश्नांची व समस्यांची सोडवणूक करीत आहे. असे मत जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी व्यक्त केले.
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे आद्यजनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी रोजी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरु केले. यानिमित्ताने हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज (ता.६) विश्रामगृह येथे आयोजित ‘प्रसारमाध्यमे आणि विकासङ्क या विषयावरील चर्चासत्राचे अध्यक्ष म्हणून श्री.बोपचे बोलत होते.
श्रमिक पत्रकार संघ गोंदिया, जिल्हा मराठी पत्रकार संघ, प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया, लघु वृत्तपत्र संपादक संघ, गोंदिया जिल्हा श्रमिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त वतीने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून नाबार्डचे सहायक महाप्रबंधक मिलिंद कंगाली, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर यांची उपस्थित होती.
श्री.बोपचे पुढे म्हणाले, पत्रकारितेच्या क्षेत्रातील विश्वासार्हता महत्वाची आहे. विश्वासार्हता असेल तर प्रसारमाध्यमामुळे विकास प्रक्रियेला गती मिळते. प्रसारमाध्यमे सर्व क्षेत्रातील ज्ञानाचे भांडार आहे. पत्रकारांना देखील त्यांच्या जीवनात अनेक अडीअडचणी व समस्यांचा सामना करावा लागतो. हया अडीअडचणी बाजूला ठेऊन पूर्णवेळ पत्रकारितेला वाहून घेणारे अनेक पत्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.सोसे म्हणाले, देशात लोकशाही यशस्वी होण्यामागे प्रसारमाध्यमांचे बहुमुल्य योगदान आहे. तंत्रज्ञानामुळे संदेशवहनाला गती मिळाली असून त्यामुळे शासन व प्रशासन कार्यप्रवण होत आहे. महिलांच्या सक्षमीकरणात प्रसारमाध्यमांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. कंगाली म्हणाले, समाजातील व्यक्ती व समस्यांचे प्रतिनिधीत्व करणारा पत्रकार आहे ती परिस्थिती समाजासमोर आणण्याचे पवित्र कार्य करतो. फक्त या क्षेत्रात प्रसारमाध्यमांनी त्यांच्यातील अतिव्यावसायिकपणा टाळावा व निष्ठेने कार्य करत राहावे.
डॉ.हुबेकर यावेळी म्हणाल्या, समाजात अनेक समस्या आहेत. त्या समस्यांना न्याय देण्याचे काम प्रसारमाध्यमे करीत आहे. देशापुढील ज्वलंत प्रश्न म्हणजे पर्यावरण, जलसाक्षरता, लिंगभेद, रोजगार, आरोग्याचे प्रश्न, कुपोषण आदी समस्या जेव्हा पूर्णपणे नष्ट होतील तेव्हा खऱ्या अर्थाने विकास होईल असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले. संचालन जयंत शुक्ला यांनी केले तर उपस्थितांचे आभार खेमेंद्र कटरे यांनी मानले. याप्रसंगी चंद्रकांत खंडेलवाल, एच.एच.पारधी, मनोज ताजणे, राधेश्याम शर्मा, नरेश रहिले, हरीश मोटघरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी तंटामुक्त गाव मोहिमेवर लिखान केल्याबद्दल राज्यस्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त करणारे नरेश रहिले, जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त करणारे संतोष शर्मा व राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्‍त मुकेश शर्मा यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी राधेश्याम शर्मा, चंद्रकांत खंडेलवाल, अशोक सहारे, सुब्रत पाल, गोपाल अग्रवाल, अपुर्व मेठी, मनोज ताजने, खेमेंद्र कटरे, संतोष शर्मा, सावन डोये, संजय राऊत, अतुल दुबे, चंद्रकांत पांडे, बिरला गणवीर, महेंद्र बिसेन, चक्रधर मेश्राम, महेंद्र माने, श्री.शेख, श्री.गलोले, श्री.तिडके, सविता तुरकर यांच्यासह जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती सहायक पल्लवी धारव, श्यामु कवासे, कैलाश गजभिये, धम्मदिप बोरकर, पंढरीनाथ लुटे, ज्ञानेश्वर वावडेकर, नारायण लिमजे, संतोष राऊत, अतुल भलावी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.