पोलिस मुख्यालयावर ६९ लाखांची थकबाकी

0
11
गोंदिया – कारंजा येथे १० वर्षांपूर्वी पोलिस मुख्यालयाचे बांधकाम करण्यात आले. हा परिसर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. ग्रामपंचायतीने करवसुलीकरिता वारंवार पत्रव्यवहार केला; परंतु पोलिस प्रशासन कर भरण्यास तयार नाही. हा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गांभीर्याने घेतला. त्याकरिता कारंजा येथे रविवारी (ता. ३) सभा घेण्यात आली. थकबाकीच्या रकमेकरिता तीव्र आंदोलन पुकारण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला असल्याची माहिती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश चौधरी यांनी दिली.
 
कारंजा येथील पोलिस मुख्यालयाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले. त्याचा ताबा २००५-०६ मध्ये पोलिस मुख्यालय प्रशासनाला देण्यात आला. पोलिस मुख्यालयाची इमारत व वसाहतीकरिता १ लाख २९ हजार २०२.५३ मीटर अर्थात १२.९२ हेक्‍टर जमिनीवर हे बांधकाम करण्यात आले. यात मोकळी जागा आणि मैदानाचादेखील समावेश आहे. हा परिसर कारंजा ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोडतो. त्यामुळे मुख्यालय प्रशासनाने ग्रामपंचायतीला ठरावीक कराचा भरणा करणे आवश्‍यक आहे. ग्रामपंचायतीने मुख्यालय प्रशासनाला थकबाकीकरिता वारंवार पत्र दिल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी श्री. लंजे यांनी दिली. मात्र, अद्याप पोलिस मुख्यालयाने थकबाकीचा भरणा केला नाही. ७५ पैसे चौरस फुटांच्या हिशेबाने १० वर्षांची थकबाकी ६९ लाख ४९ हजार ८६० रुपये एवढी झाली. पक्के बांधकाम असल्याने ही आकडेवारी अधिक फुगण्याची शक्‍यता आहे. 
 
ही बाब कारंजा येथील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रस्ते, साधन सुविधा व आस्थापना शाखेचे जिल्हाध्यक्ष सुरेश चौधरी यांच्यासमोर मांडली. त्यासंदर्भात सुरेश चौधरी यांनी कारंजा येथील नागरिकांची सभा रविवारी (ता. ३) घेतली. या वेळी सुरेश चौधरी यांनी हा मुद्दा गंभीर असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. नागरिकांनीदेखील आंदोलनात सहभागी होण्याचे आश्‍वासन दिले. सभेत प्रामुख्याने जिल्हा उपाध्यक्ष नितीन रहांगडाले, राघवेंद्र चौरसिया, एडविन निकोलस, सरपंच मंगला रणदिवे, उपसरपंच मिताराम हरडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.