एक हात मदतीचा’तून शिष्यवृत्ती;डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचा उपक्रम

0
35

गोंदिया,- ‘शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, जो पिणार ते गुरगुरणार’ असे डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. शिक्षणाचे हेच महत्व पटवून समाजात जे होतकरू आणि हुशार मुले आहेत. मात्र त्यांची परिस्थिती बेताची आहे. अशांना शिष्यवृत्ती देवून आणि केवळ शिष्यवृत्तीच नव्हे, तर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलण्याचा चंग डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीने बांधला. त्याकरिता एक हात मदतीचा हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याकरिता समाजबांधवांकडून मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

समाजात अनेक हुशार आणि होतकरू मुले आहेत. मात्र त्यांची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. आधीच हातावर पोट असताना शिक्षणाकरिता कुठून पैसा आणावा, असा त्यांच्यासमोर सवाल उभा ठाकतो. आर्थिक अडचणीमुळे त्यांना मध्येच शिक्षण सोडावे लागते. गुणवत्ता असूनही शिक्षण मध्येच सोडण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नसतो. अशा विद्यार्थ्यांचे भविष्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने त्यांना मदतीचा हात देवून त्यांच्याकरिता शिक्षणाची दारे उघडून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीने एक हात मदतीचा हा उपक्रम नव्यानेच सुरू केला आहे. त्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्याकरिता जयंती उत्सव समितीतर्फे एक लाख रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. हा निधी शिष्यवृत्तीकरिता राखीव ठेवण्यात येणार आहे. त्याकरिता गरजू विद्यार्थ्यांची नोंदणी १४ एप्रिल ते ३० एप्रिल या काळात करण्यात येणार आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार आहे. समाजाने देखील अशा होतकरू विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य घडविण्यासाठी हातभार लावावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. केवळ शिष्यवृत्ती देण्यापुरताच हा उपक्रम नसून त्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणात देखील आर्थिक मदत करण्यात येणार आहे. समाजबांधवांनी एक हात मदतीचा देवून उच्चशिक्षित समाज घडविण्यास मदत करावी, असे आवाहन सविता उके यांनी केले आहे.

एमपीएससीच्या धर्तीवर स्पर्धा परीक्षा

जयंती उत्सव समितीच्या वतीने १५ एप्रिल रोजी एसपीएससी स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सकाळी ११ वाजतापासून करण्यात येणार आहे. माजी पोलीस अधीक्षक डॉ. संजय अपरांती मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे.