शेतकरी सिंचनाच्या पाण्यापासून वंचित-डॉ. रहांगडाले

0
9

तिरोडा : कवलेवाडा ग्रामपंचायतच्या सभागृहात शेतकर्‍यांसाठी मिळणार्‍या धापेवाडा टप्पा-१ च्या पाण्यासंबंधीची सभा पार पडली. यात धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी पाण्यापासून वंचित होत आहेत, असे मत डॉ. रहांगडाले यांनी व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी डॉ. सुशील रहांगडाले होते. याप्रसंगी प्रामुख्याने डॉ.बी.एस. रहांगडाले, ईश्‍वरदयाल रहांगडाले, माजी पं.स.सभापती प्रभू पटले, जगदिश कटरे, देवलन पारधी, स्वाती चौधरी उपस्थित होते.
सभेतील अनेक शेतकर्‍यांनी चर्चेत भाग घेतला व आपली मते प्रदर्शित केली. धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे अधिकारी जाणूनबुजून शेतकर्‍यांकडून वसुली करीत नसून जेणेकरून वसूली न झाल्याच्या नावावर पाणी देणे बंद करावे लागेल. वसुली न झाल्याने यावर्षी रबी पिकांसाठी पाणी मिळणार नसल्याने शेतकर्‍यांमध्ये आक्रोश व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अगोदरच यावर्षी पीक फारच कमी प्रमाणात झाले. कधी रोगांचा प्रादुर्भाव तर कधी पाण्याची कमतरता, याचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत आहे. धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-१ वर विद्युत बिल ३0लाख रूपये बाकी आहे. त्याची परिपूर्ती होणे आवश्यक आहे. ते न झाल्यास रबी धानासाठी पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी घरोघरी जावून वसूली करणे गरजेचे आहे. यात कवलेवाडा, मरारटोला, पुजारीटोला, चिरेखनी, बेलाटी खुर्द, बेलाटी बु., मुंडीपार, मांडवी, सालेबर्डी या गावांतील ४00हेक्टर जमिनीचा समावेश आहे.
येथील शेतकर्‍यांवर ५0 लाख रुपये खरीप पाण्याचे बाकी आहेत. अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून गावोगावी जाऊन वसुली न केल्याने वसुली होत नाही.त्यामुळे पाणी वाटपातून सूट मिळेल, अशी भावना असल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी दोन-तीनवर्षांपूर्वी ९९ टक्के वसुली होत असल्याचे बोलले जाते.लवकरात लवकर शेतकर्‍यांना पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचे सभेत ठरविण्यात आले. सभेला संबंधित गावांतील सरपंच तसेच प्रतिष्ठीत नागरिक व शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.