सहा महिन्यांपासून पीएचसीतील कर्मचार्‍यांचे वेतन थकले

0
35

नागपूर- जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणार्‍या प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी) मध्ये कार्यरत शेकडो कंत्राटी सफाई कर्मचार्‍यांचे गेल्या सहा महिन्यांपासून कंत्राटदार कंपनीकडे वेतन थकले आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांना आपले व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे या कंत्राटदार कंपनीने या कर्मचार्‍यांना ठरवून दिलेल्या वेतनापेक्षाही ते कमी वेतन देत असल्याचा आरोप कर्मचार्‍यांचा आहे. या सर्व व्यथा त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) योगेश कुंभेजकर यांच्याकडे मांडल्या असून, आपले थकीत व कंपनीकडून कमी देण्यात आलेले वेतन जि.प. सेसफंडातून देण्याची मागणी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअखत्यारित जवळपास ५४ पीएचसी कार्यरत आहेत. त्यापैकी ३५ वर पीएचसींमध्ये कंत्राटी तत्त्वावर सफाई कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. कर्मचार्‍यांनी निवेदनाद्वारे सीईओंना सांगितले की, ते मागील १0 ते १५ वर्षांपासून तूटपुंज्या मानधनावर येथे कार्यरत आहेत. कोरोनाकाळात त्यांना कोरोना योद्धा म्हणूनही गौरवान्वित केले. पूर्वी कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती नसताना रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून वेळेत मानधन मिळायचे. सद्यस्थितीत सफाई कर्मचार्‍यांचे कंत्राट मे. सिंग कमांडो सिक्युरिटी फोर्स प्रा. लि. यांना आहे. यापूर्वी असलेल्या कंत्राटदार कंपनीकडून कर्मचार्‍यांना वेळेत व योग्य वेतन दिल्या जात होते.
विशेष म्हणजे, विद्यमान कंत्राटदार कंपनीने या क र्मचार्‍यांना कामावर रुजू होण्याचे कुठलेही पत्र दिले नाही. कर्मचार्‍यांनी त्यांना ते मागितल्यावर त्यांच्याकडून सांगण्यात आले की, पीएचसीतील अधिकार्‍यांना पत्र देण्याची गरज नाही. असे उडवाउडवीचे उत्तर कंत्राटदार कंपनीकडून दिल्या जात असल्याचा आरोप कर्मचार्‍यांचा आहे. त्यातच कंपनीने कर्मचार्‍यांना मागील सहा महिन्यांपासून वेतनसुद्धा दिलेले नाही. नुकतेच दोन-तीन दिवसांपूर्वी कर्मचार्‍यांना एक पगार देण्यात आला. परंतु यानंतरही पाच ते सहा पगार कर्मचार्‍यांचे थकले आहेत. याशिवाय कंपनीकडून केवळ ६७00 रुपये पगार दिला जातो आणि आरोग्य अधिकार्‍यांनी विचारणा केल्यावर त्यांना ४ हजार प्रतिमहा अँडव्हॉन्स देत असल्याचे चुकीचे सांगण्यात येत असल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी केला आहे. त्यामुळे थकीत सहा महिन्यांचा पगार तसेच १0 महिन्यांचे प्रति ४ हजार लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे.