समता मेळाव्याला खा.आठवलेंची राहणार उपस्थिती

0
15

गोंदिया,दि.१५: -डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए) गोंदिया जिल्हा शाखेच्यावतीने येत्या १७ जानेवारीला समता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले उदघाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.तर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.राजकुमार बडोले हे अध्यक्षस्थानी राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेश रामटेके यांनी पत्रपरिषदेत दिली.
पक्षाच्यावतीने देशातील १२५ जिल्ह्यात समता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्याला समता मेळावा आयोजित करण्याचा मान मिळाल्याचे सांगितले.तसेच खा.आठवले यांच्या नेतृत्वात २६ जानेवारीपासून कन्याकुमारी ते महू ही भारत भीमयात्रा काढण्यात येणार आहे.२४ एप्रिल रोजी ही यात्रा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव महू येथे पोचणार असल्याचेही रामटेके यांनी सांगितले.या मेळाव्याच्या माध्यमातून जनतेच्या समस्या,बेरोजगारी,शेतकरी आत्महत्यासह आरक्षणावर चर्चा करण्यात येणार आहे.या मेळाव्याला खा.आठवले यांच्यासोबत पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील,प्रदेश अध्यक्ष भुपेश थुलकर,भीमराव बनसोड,एल.के.मडावी,अशोक मेश्राम आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली.पत्रपरिषदेला जिल्हाध्यक्ष राजेश रामटेके,महासचिव सुर्यभान कोल्हटकर,विदर्भ सचिव नरेश मेश्राम,भाऊ गजभिये,ओकांर ऊके,गडचिरोलीचे अध्यक्ष मेंगराज गुठके,नरेंद्र बोरकर व रqवद्र रहांगडाले उपस्थित होते.