खत व बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा- पालकमंत्री

0
29
  • खरीप हंगाम आढावा बैठक

         गोंदिया,दि.30 : खरीप हंगाम सुरू होण्यास फार थोडा अवधी बाकी असून शेतकऱ्यांना खत व बियाणे योग्य प्रमाणात उपलब्ध व्हायला हवीत. खत व बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कृषी विभागाने कडक कारवाई करावी असे निर्देश पालकमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले.

         राज्यमंत्री नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा पालकमंत्री गोंदिया प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगाम आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ.परिणय फुके, विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापूरे, सहसराम कोरोटे, जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, अग्रणी बँक व्यवस्थापक उदय खर्डेनवीस, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे उपस्थित होते.

          जिल्ह्यात खताचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले. खरीप हंगाम सन २०२२-२३ साठी १ लाख ७ हजार ४७५ मेट्रिक टन खताची मागणी आहे. आयुक्तालयांकडून ६६ हजार ६५० मेट्रिक टन आवंटन मंजूर करण्यात आले आहे. मागील वर्षाचा एकूण शिल्लक साठा १८ हजार ७०९ मेट्रीक टन एवढा आहे. तर सर्व पीक मिळून ४७ हजार ५२२ क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. बोगस बियाणे, खत व औषधी विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कृषी सेवा केंद्रात प्रमाणित बियाणेच विक्री केले जावे असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

         पीक कर्ज वाटपाचा मुद्दा या बैठकीत चर्चेला आला. व्यापारी बँकांनी केवळ उद्दिष्टांच्या केवळ २४ टक्के पीक कर्ज वाटप केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न करणे ही गंभीर बाब असल्याचे पालकमंत्री म्हणाले. अशा बँकांवर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. खरीप हंगाम सन २०२२-२३ साठी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक १८५.२५ कोटी, ग्रामीण बँक ३६.३१ कोटी व राष्ट्रीयकृत व व्यापारी बँक ८९.६७ कोटी असे एकूण ३११ कोटी २३ लाखांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.