महाराष्ट्रात प्रथम वैनगंगा नदीत होणार जलवाहतुक- नितीन गडकरी 

0
16

• जिल्हयात 5 हजार कोटी रुपयांच्या महामार्ग कामांना सुरुवात
• जिल्हयात 394 किलोमिटरचा महामार्ग घोषित
• 10 हजार तरुणांना रोजगार देण्याची योजना
• शेतकऱ्यांच्या पिकविम्यासाठी नवीन धोरण

प्रा.राजेंद्र दोनाडकर

भंडारा, दि, 23:- जगात 30 ते 40 टक्के वाहतुक ही जलमार्गाने होते, मात्र भारतात हे प्रमाण केवळ 3.5 टक्के आहे. देशात जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी या शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रात वैनगंगा नदीमध्ये जलमार्गाची सुरुवात करण्याला लोकसभेने मंजूरी दिली असून लवकरच राज्यसभेची मंजूरी मिळाल्यावर वैनगंगा नदीवर जलमार्गाची उभारणी करण्यासाठी महाराष्ट्रात प्राथमिकता देण्यात येईल, असे प्रतिपादन केंदीय भूतल परिवहन, महामार्ग तथा जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

लाखनी येथे क्रिडा संकुलात आयोजित राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील उड्डाण पुलाच्या शिलांन्यास कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार नाना पटोले, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आमदार सर्वश्री बाळा काशिवार, रामचंद्र अवसरे, चरण वाघमारे, संजय पुराम, जिल्हाधिकारी धीरजकुमार, माजी आमदार डॉ. हेमचंद्र कापगते, भारतीय राष्ट्रीय महामार्ग अथारिटीचे एम. चंद्रशेखर, पी. आर.मिना लाखनीचे नगराध्यक्ष रजनी भिवगडे उपस्थित होते.
यावेळी श्री. गडकरी यांनी लाखनी व साकोली येथील उड्डाण पुल, भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, लाखांदूर ते ब्रम्हपुरी रोड वरील वैनगंगा नदीवरील पुलाचे काम तसेच तुमसर देवाडी रस्त्या अशा 1 हजार 20 कोटी रुपयांचे काम सुरु केल्याची घोषणा केली. त्याचबरोबर जिल्हयात 394 किलोमीटरच्या नवीन राष्ट्रीय महामार्गाची घोषणा केली. हे काम सिमेंट काँक्रिटचे होणार असून या कामाची किंमत 4 हजार कोटी रुपयांचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर जंगल क्षेत्रातील 8 किलोमीटरच्या रस्त्याचे तसेच केंद्रीय निधी अंतर्गत सुरु होणाऱ्या कामाची माहिती दिली.
देशात शेतकऱ्यांची अवस्था चांगली नाही हे सरकार जाणून आहे. शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे आतापर्यंत मिळत नव्हते. यासाठी सरकारने क्रांतीकारी निर्णय घेवून सरकारने यामध्ये 30 हजार कोटी रुपये देण्याचे ठरविले आहे. त्याचबरोबर विम्याचा हप्ता कमी करणे, नापिकी झाल्यास शेतकऱ्यांना तात्काळ लाभ मिळावा यासाठीची नवीन व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. याचा निश्चितपणे शेतकऱ्यांना फायदा होईल, असेही ते म्हणाले.
खतांच्या किमती कमी करणे, शेतकऱ्यांना बाराही महिने पाणी उपलब्ध करुन देणे, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करुन उत्पादन वाढविणे, शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा निर्माण करुन देणे आणि पिकांच्या सुरक्षिततेकरीता विम्याचे संरक्षण मिळावे असे धोरण स्विकारुन शासन अनेक निर्णय घेत आहे.
धानाचे तणस आपण जाळून टाकतो. ते शेतकऱ्यांकडून 2 हजार रुपये दराने विकत घेवून त्यापासून इथेनॉल तयार करुन ते गाडयांमध्ये वापरण्याची योजना तयार केली जात आहे. त्याचबरोबर प्लॉस्टिक बाटल्यांपासून बायोप्लॉस्टिक तयार करण्याची योजना राबविण्याचा मानस आहे. ज्यामध्ये भंडारा जिल्हयातील 10 हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, असेही श्री. गडकरी यांनी सांगितले.
देशात 40 टक्के कोळसा खाणी आहेत. मात्र त्या अतिशय खोल गेल्यामुळे त्यातून कोळसा काढणे खर्चिक झाले आहे. त्यामुळे या कोळसा खाणीमधून कोल गॅसिफिकेशन करुन युरिया उत्पादन घेण्यात येईल. युरियासाठी देण्यात येणारे 55 हजार कोटींचे अनुदान यामुळे वाचेल. तसेच शेतकऱ्यांना आता पेक्षा 50 टक्के कमी दराने युरिया उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे यासाठी सेंद्रिय खतावर 1 हजार 500 रुपये टन अनुदान देण्याचेही शासनाने ठरविले आहे,असेही त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार नाना पटोले यांनी जिल्हयात 5 हजार कोटीं रुपयांच्या महामार्ग कामांच्या मंजूरीसाठी नामदार गडकरी यांचे आभार मानले. तसेच जिल्हयातील गोसेखुर्द धरण पुर्ण करावे, शेतीवर आधारित उद्योग सुरु करावेत आणि जिल्हयातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी योजना तयार करावी,अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
या कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरेशी, नॅशनल हॉयवे अथारिटी ऑफ इंडियाचे अनिल गांधी, आशिष कटारिया, श्रीराम मिश्रा, माजी आमदार सेवक वाघाये, माजी जिल्हा परिषद सदस्य विनायक बुरडे, भरत खंडाईत, श्रीराम गिऱ्हेपुंजे तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.