समाज परिवर्तनात व्यसनमुक्ती महत्वाची- केंद्रिय मंत्री गडकरी

0
19

ङ्घ चवथ्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचा समारोप
ङ्घ ५२ संस्था व व्यक्तींचा सत्कार
ङ्घ १० ठराव पारीत

गोंदिया, दि. २३ : व्यसनाधिनतेमुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होते. समाजाला प्रशिक्षण व प्रबोधनातून व्यसनमुक्त करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने उचललेले पाऊल निश्चितच कौतूकास्पद आहे. समाजाच्या परिवर्तनात व्यसनमुक्तीची भूमिका महत्वाची आहे. असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
आज (२३) गोंदिया येथील स्वागत लॉनमध्ये देशातील चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार ना. गडकरी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
मंचावर पालकमंत्री राजकुमार बडोले, खा.नाना पटोले, आमदार सर्वश्री गोपालदास अग्रवाल, संजय पुराम, विजय रहांगडाले, संमेलनाध्यक्ष मुक्ता पुणतांबेकर, जय मल्हार फेम अभिनेता देवदत्त नागे, गोंदिया नगराध्यक्ष कशिश जायसवाल, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गडकरी पुढे म्हणाले, समाजाचे स्वास्थ चांगले राहावे यासाठी आपणही समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून व्यसनमुक्तीसाठी काम करावे. समाजात व राजकारणात सामाजिक दायित्वाची भावना जास्त दिसून येत नाही. सामाजिक दायित्वाची भावना वाढली तर निश्चितच सामाजिक सुधारणांना गती येईल. शासनातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीतून काम केल्याचे चित्र त्यांना मिळालेल्या पुरस्कारातून दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, सामाजिक संवेदनशिलतेतून काम केले तर त्याचे कौतूक होते आणि त्यांच्यापासून इतरांना प्रेरणाही मिळते. संस्थांनी व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात केलेले कार्य निश्चित मोठे आहे. समाजच समाजाला बदलवितो. समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन सर्वांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करावा.असेही श्री. गडकरी म्हणाले.
पालकमंत्री बडोले म्हणाले, देशाला व्यसनमुक्त करण्यासाठी आधी समाज व्यसनमुक्त झाला पाहिजे. बलशाली भारतासाठी प्रत्येकाने व्यसनमुक्त होण्याचा संकल्प करावा. नैसर्गिकदृष्टया सुंदर असलेल्या गोंदिया जिल्हयात पर्यटनातून व उद्योगातून अनेकांच्या हातांना काम मिळाले पाहिजे यासाठी आपण रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.