नागपूरला स्मार्ट शहर बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
9

नागपूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 66 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्क येथे झाला. यावेळी पोलीस व विविध महाविद्यालयाच्या पथकांनी परीविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री बावनकुळे यांना सलामी दिली. यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार, पोलीस आयुक्त एस. पी. यादव, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते.

नागपूर शहराला देशातील पहिल्या 30 स्मार्ट शहरांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी शहरातील सर्वपक्षीय आमदार, महापौर प्रवीण दटके आणि मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांचेही प्रयत्न सुरु आहेत, नागपूर येथील मिहान प्रकल्पाला गती देणे, मेट्रो रिजनचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्यातील युवा मनुष्यबळ संसाधनाला रोजगार मिळावा यासाठी राज्य सरकार आधुनिक पद्धतीने काम करत आहे. नागपूर शहराच्या विकासासाठी 15 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. आय. आय. आय. टी, आय. आय. एम., नॅशनल लॉ विद्यापीठाची स्थापना करण्यात येत आहे. सिम्बॉयसिस ही अग्रणी संस्थाही नागपूर शहरात येण्यासाठी उत्सूक आहे.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम तसेच सह पोलिस उप निरीक्षक भास्करराव वानखेडे, विशेष शाखा (नागपूर शहर) यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी शहरातील या बालकाच्या अपहरणानंतर यशस्वी कामगिरी करणाऱ्या पोलीस उपायुक्त शैलेंद्र बलकवडे यांना सन्मानित करण्यात आले.

पथसंचलनाचे प्रथम पारितोषिक प्रहार विद्यालय, द्वितीय राजेंद्र हायस्कूल आणि तृतिय पारितोषिक राजकुमार केवलरामानी शाळेला मिळाले. जिल्हा क्रीडा विभागाच्यावतीने देण्यात येणारे पुरस्कार गुणवंत खेळाडू (पुरुष) नवल गुप्ता (तलवारबाजी), महिला गटात श्रेया आयलवार (तलवारबाजी), गुणवंत क्रीडा मागदर्शक सुनील हांडे (व्हॉलीबॉल), गुणवंत संघटक धैर्यशील सुट (भारत्तोलन) यांना देण्यात आला. सामाजिक कार्यात असंघटीत युवकांना तरुणांच्या व नागरिकांच्या सुप्त गुणांना संधी देऊन भरीव योगदान दिल्याबद्दल जिल्हा युवा पुरस्कार (युवती) शीतल गडलिंग, जिल्हा युवा पुरस्कार (युवक) लकी तरारे, जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेला देण्यात आला.