मामा तलावांच्या खोलीकरणासह मत्स्य संवर्धनाचा कार्यक्रम राबवा-वित्त व नियोजन मंत्री मुनगंटीवार

0
11

गोंदिया जिल्हा नियोजन आढावा बैठक

नागपूर, दि. ८ : पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्हयात माजी मालगुजारी तलाव मोठया प्रमाणात आहे. या तलावात मोठया प्रमाणात सिंचनाची क्षमता आहे. या तलावांच्या खोलीकरणाची कामे प्रभावीपणे करुन मत्स्य संवर्धनाचा कार्यक्रम मोठया प्रमाणात राबवा, असे निर्देश वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
आज ८ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१६-१७ चा गोंदिया जिल्हयाचा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी आयोजित राज्यस्तरीय बैठकीत अध्यक्षस्थानावरुन श्री. मुनगंटीवार बोलत होते.
बैठकीत पालकमंत्री राजकुमार बडोले, वित्त राज्यमंत्री दिपक केसरकर, आमदार सर्वश्री गोपालदास अग्रवाल, संजय पुराम, विजय रहांगडाले, पालक सचिव पी.एस. मीना, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, वित्त विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उपनवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
वित्त व नियोजन मंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, जिल्हयात सिंचनाची क्षमता वाढविण्यासाठी माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीची कामे करण्यासाठी यांत्रिकी विभागाची मदत घ्यावी त्यामुळे खर्च कमी येईल. विविध यंत्रणा व लोकसहभागातून तलावांच्या दुरुस्तीची व जलयुक्त शिवार अभियानाची कामे करावी. कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती जास्तीत जास्त करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर जिल्हयात मोठया प्रमाणात मत्स्य संवर्धन व उत्पादन घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आंध्र प्रदेशचा दौरा करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
जिल्हयातील तलावांवर अतिक्रमण होणार नाही, याकडे लक्ष देण्यात यावे असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, अशा तलावातून जास्तीत जास्त सिंचन क्षमता निर्माण होईल याचे नियोजन करण्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्हयातील १० पर्यटनस्थळांचा विकास करुन जास्तीत जास्त पर्यटक जिल्हयात यावेत आणि त्यामाध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी व वन पर्यटनासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करुन द्यावा.
१०० एकरापेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या तलावांच्या खोलीकरणाचे काम चांगले झाले असून त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या १७०० तलावातील गाळ काढण्याचे नियोजन करुन तलाव खोलीकरणाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात यावा व त्यामधून मत्स्यसंवर्धन मोठया प्रमाणात करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्राम विकास , रस्ते विकास, लघू पाटबंधारे यासाठी अधिक निधी देण्यात यावा अशी अपेक्षाही पालकमंत्री बडोले यांनी व्यक्त केली.
आमदार अग्रवाल यांनी माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीसाठी, दिवाबत्तीच्या विद्युत खांबासाठी, वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी अतिरिक्त निधी देण्यात यावा. तसेच निधीमध्ये कपात करण्यात येऊ नये अशीही अपेक्षा व्यक्त केली.
जिल्हयात राष्ट्रीय महामार्गावरील कोहमारा येथे बांबू हस्तशिल्प कलेतून वस्तूंची निर्मिती व विक्रीसाठी केंद्र सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिली. यामधून रोजगार निर्मितीस हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. मानव विकास निर्देशांकात गोंदिया जिल्हा राज्यात २७ व्या क्रमांकावर असल्यामुळे जिल्हयाला मागणी केल्याप्रमाणे निधी उपलब्ध झाल्यास मानवी विकास निर्देशांक वाढण्यास मदत होणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण ) सन २०१४-१५ मध्ये ८५ कोटी रुपये अर्थसंकल्पीत असता ८४ कोटी ९३ लक्ष रुपये खर्च करण्यात आले तर सन २०१५-१६ च्या योजनेत ११४ कोटी ९२ लक्ष अर्थसंकल्पीत असता जानेवारी २०१६ अखेर ३२ कोटी ३७ लक्ष रुपये खर्च करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१६-१७ चा प्रारुप आराखडा सादर करण्यात आला असून ८६ कोटी ५७ लक्ष रुपये शासनाने ठरवून दिलेली आर्थिक मर्यादा असून अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी १९९ कोटीची मागणी केली असून यामध्ये अतिरिक्त मागणी ११२ कोटी ४३ लक्ष रुपयांची आहे.
या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, जिल्हा नियोजन अधिकारी बकूल घाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांचेसह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.