निसर्गाने दिव्यांग केले, सरकार तुमच्या पाठीशी : खा.मेंढे

0
16

अर्जुनी-मोरगाव : आपण सर्व या भूतलावर मनुष्य म्हणून जन्मास आलो. नर आणि नारी या दोनच जाती. मात्र निसर्गाने कुणाला जन्मताच तर कुणी जन्मानंतर दिव्यांग केले. दिव्यांगपणाला शाप समजू नका. समाजाने, निसर्गाने दिव्यांग केले मात्र सरकार आपल्या पाठीशी आहे. दिव्यांगांच्या कल्याणासाठी शासन अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित करीत असल्याचे प्रतिपादन भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांनी केले.

ते स्थानिक ग्रामीण रुग्णालयात आजादी का अमृत महोत्सव निमित्त दिव्यांगांची आरोग्य तपासणी आणि वैश्विक दिव्यांगतत्व ओळखपत्र वितरण समारंभाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.पं.स. सभापती सविता कोडापे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात जिप सदस्य लायकराम भेंडारकर, उपसभापती होमराज पुस्तोडे, न.पं. उपाध्यक्ष ललिता टेंभरे, तहसीलदार विनोद मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ.देवेंद्र घरतकर, प.स. सदस्य नूतनलाल सोनवाणे, डॉ.नाजूक कुंभरे, डॉ.गजानन डोंगरवार, नगरसेवक एसकुमार सहारे, विजय कापगते, इंदू लांजेवार उपस्थित होते.

खा.मेंढे पुढे म्हणाले, दिव्यांगांच्या सेवेसाठी जिल्ह्यात तीन शिबिर झाले. प्रत्येक तालुक्यात शिबीर होणार आहेत. दिल्लीची चमू तपासणी करता येणार. गोंदियाच्या शिबिरात 5 हजार दिव्यांगांना साहित्य आणि दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप होणार. मोदी सरकार आपल्या सोबत आहे असे आश्वासीत केले. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरीच्या पूजनाने झाली. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक डॉ.भारत लाडे, संचालन कक्ष अधिकारी ज्ञानेश्वर लोहंबरे, आभार टीएमओ डॉ.विजय राऊत यांनी मानले.दिव्यांग

शिबिरात दिव्यांगांची हेळसांड

सदर कार्यक्रम वैश्विक दिव्यांगतत्व ओळखपत्र वितरणाचा होता. मात्र आलेल्या एकही दिव्यांगाला प्रमाणपत्राचे वाटप झाले नाही. दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप होईल अशी माहिती देण्यात आली होती. दिव्यांगांना सकाळी नऊ वाजता बोलविण्यात आले चार वाजतापर्यंत ते कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. दरम्यान रुग्ण तपासणी, कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. दिव्यांग लहान बालके, महिला, पुरुष भर उन्हात उपासपोटी तात्काळत होती. दिव्यांग प्रमाणपत्राच्या आसेने आलेली ही मंडळी निरास होऊन परत गेली.